पुणे महापालिकेची आठ लाख कोरोना प्रतिबंधक लस साठवण्याची क्षमता; आरोग्य प्रमुखांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 11:50 AM2020-12-22T11:50:30+5:302020-12-22T11:51:03+5:30
कोरोना लसीचे लसीकरण हे मतदान बूथप्रमाणे (३ रूम असलेले) करण्यात येणार आहे.
पुणे : कोरोनावर येऊ घातलेल्या लस कशारितीने द्यायच्या याचे प्रशिक्षण आरोग्य क्षेत्रातील सेवकांना देतानाच, पुणे महापालिकेने लस साठवणुक क्षमतेचीही मोठ्या प्रमाणात निर्माण केली आहे. आजमितीला पुणे महापालिकेने आठ लाख लस साठवणूक ठेवता येईल एवढ्या डीपफ्रिजरची व्यवस्था केली आहे.
पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेने ७० आय.एल.आर. (५ हजार लिटर) व ४० डीप फ्रिजर यामध्ये ८ लाख लस साठवणूक करता येईल अशी व्यवस्था केली आहे. पुणे महापालिकेच्या सर्व रूग्णालयांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना लसीचे लसीकरण हे मतदान बूथप्रमाणे (३ रूम असलेले) करण्यात येणार आहे. यामध्ये ५ सेवकांची एक टीम कार्यरत राहणार आहे. यात १ लस टोचक व १ सुरक्षारक्षक असणार आहे. मतदान प्रक्रियेप्रमाणे लसीकरण मोहिम पार पडणार असून, लसीकरणाच्या पोर्टलवर नाव असलेल्या व नोंदणीकृत ओळखपत्र असलेल्यांनाच लस देण्यात येणार आहे. तसेच ज्यावेळेस सर्व सामान्य नागरिकांना लसीकरण खुले करण्यात येईल. त्यावेळी मोबाईल अॅपव्दारे संबंधितांना माहिती भरता येणार आहे.
कोविड-१९ ची लस टप्प्या-टप्प्याने देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा देणारे सर्व कर्मचारी यांना, दुसऱ्या टप्प्यात पुणे महापालिका, पोलिस दल, गृहरक्षक अधिकारी व नागरी संरक्षण दल अधिकारी कर्मचारी यांना तर तिसऱ्या टप्प्यात जोखीम ग्रस्त व्यक्ती (५० वर्षावरील व व्याधी असलेले) यांना लस देण्यात येणार आहे. तर चौथ्या टप्प्यात सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेकडे आजमितीला वैद्यकीय सेवा देणाऱ्या सरकारी व खाजगी अशा ४५ हजार १४३ जणांची नोंदणी करण्यात आलेली असल्याची माहितीही डॉ़भारती यांनी दिली.