राजधानी ‘तेजस’ होणार अन् सुविधांसह तिकिटाचे दरही वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:12 AM2021-05-10T04:12:08+5:302021-05-10T04:12:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या शताब्दी व राजधानी एक्स्प्रेसला तेजस एक्स्प्रेसचे डबे जोडणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील प्रमुख रेल्वे मार्गांवर धावणाऱ्या शताब्दी व राजधानी एक्स्प्रेसला तेजस एक्स्प्रेसचे डबे जोडणार आहे. याची सुरुवात आगरतळा राजधानीने झाली. अन्य राजधानीला देखील हा बदल टप्प्याटप्प्याने केला जाईल. मात्र, हे करत असताना रेल्वे प्रशासन या दोन्ही गाड्यांच्या मूळ तिकीट दरात ५ टक्क्यांनी वाढ करण्याची दाट शक्यता आहे. दराबाबत रेल्वे प्रशासन आताच काही उघडपणे बोलत नाही. मात्र, ज्या पद्धतीने वंदे भारत एक्स्प्रेसच्या दरात वाढ झाली त्याच पार्श्वभूमीवर राजधानीला देखील वाढ होईल, हे निश्चित.
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी रेल्वे बोर्डने बहतांश प्रीमियम रेल्वे रद्द केली आहे. मात्र, त्याचा ह्या निर्णयावर कोणताच परिणाम होणार नाही. रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरीत तेजसचे ५०० डब्यांचे उत्पादन केले जात आहे. पैकी ९० डब्यांचे उत्पादन झाले आहे. कोरोनाची लाट ओसरल्यावर परिस्थिती सामान्य बनल्यानंतर, रेल्वे प्रशासन ही प्रक्रिया गतीने करेल. भविष्यात खासगी रेल्वे धावणार असल्याने त्यांच्याशी स्पर्धा करता यावी याकरिता हा बदल केला जात आहे.
देशांत २३ राजधानी एक्स्प्रेस व २३ शताब्दी एक्स्प्रेस आहेत. सर्व गाड्या ह्या प्रीमियम रेल्वे म्हणून ओळखल्या जातात. राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसचे डबे जुने झाल्याची सबब सांगून रेल्वे प्रशासन ह्या गाड्यांना जस जसे तेजसचे डबे उपलब्ध होतील तसे ते जोडणार आहे.
कोट
राजधानी व शताब्दीच्या डब्याच्या तुलनेत तेजसचे डबे चांगले आहेत. त्यामुळे त्याचा वापर केला जाईल. तेजसचे डबे जसे उपलब्ध होतील तसा हा बदल केला जाईल. यामुळे प्रवाशांना प्रवासाचा वेगळा अनुभव येईल. तिकीट दराबाबत इतक्यांत काही बोलता येणार नाही.
- आर. डी. बाजपाई, कार्यकारी संचालक, माहिती व प्रसारण विभाग, रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली
कोट
रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार आम्ही तेजसच्या डब्यांचे उत्पादन सुरू केले आो. आता पर्यंत जवळ चार रेकचे कोच तयार झाले आहे. हे सर्व स्मार्ट कोच आहेत.
- व्ही. के. दुबे, मुख्य जनसंपर्क अधिकारी