पुणे रेल्वे स्थानकावर ‘कॅप्टन अर्जुन’ची असणार गस्त; प्रवाशांच्या शरीराचे ताप मोजण्याचेही करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 08:59 PM2020-06-12T20:59:01+5:302020-06-12T21:01:21+5:30
कोरोनासह प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या रोबोटची खुप मदत होणार
पुणे : रेल्वे स्थानकावर अचानक गर्दी, धावपळ सुरू झाली तर सुरक्षा यंत्रणेला कॅप्टन अर्जुन’ कडून तातडीने संदेश पाठविला जाणार आहे. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या शरीराचे ताप मोजण्याचे कामही कॅप्टन करणार आहे. हा कॅप्टन एक रोबोट असून पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आला.
रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) संकल्पनेतून या रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डचे महासंचालक अरूण कुमार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुख्य सुरक्षा आयुक्त अतुल पाठक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणु शर्मा, मुख्य सुरक्षा आयुक्त अलोक बोहरा आणि विभागीय सुरक्षा आयुक्त अरूण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत आॅनलाईन पध्दतीने रोबोटचे लोकार्पण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रेल्वेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये या रोबोटमुळे महत्वाची भर पडली आहे. कोरोना संशयितांचा शोध घेणे तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा रोबोट महत्वाची भुमिका पार पाडणार आहे.
कॅप्टन अर्जुनमध्ये फिरता सेन्सर, कॅमेरा तसेच एक डोम कॅमेरा आहे. या कॅमेरामध्ये कत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. कॅमेरापासून ५०० मीटर अंतरावरील संशयित हालचाली टिपता येणार आहेत. एकदा प्रवासी पळून जावू लागला, अचानक गोंधळ वाढला तर रोबोट कडून तातडीने नियंत्रण कक्षाला संदेश पाठविला जाईल. तसेच पळून जाणाºया व्यक्तीवर कॅमेरा केंद्रीत होऊन तो त्यादिशेने फिरत राहील. तसेच सायरनचा आवाज येऊ लागेल. रोबोटमध्ये थर्मल स्कॅनर असून त्यासमोर हात केल्यास ०.५ सेकंदात शरीराचे तापमान मोजले जाईल. निश्चित तापमानापेक्षा जास्त असल्यास लगेच अलार्म वाजेल. ऑडिओ व व्हिडिओच्या माध्यमातून हा रोबोट प्रवाशांशी संवादही साधणार आहे. तसेच कोरोनावर जनजागृतीही केली जाणार आहे.
------------
सध्या एकच रोबोट असून तो पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ठेवला जाईल. तसेच प्रवाशांचे तापमान मोजण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वारावरही ठेवण्यात येणार आहे. कोरोनासह प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या रोबोटची खुप मदत होणार आहे.
- अरूण त्रिपाठी, विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे