बारामती—पुणे मार्गावर कार आणि बुलेटचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:31 PM2018-07-16T22:31:21+5:302018-07-16T22:31:41+5:30
बारामती—पुणे मार्गावर मेडद गावच्या हद्दीत कार आणि बुलेटचा सोमवारी (दि. १६) सकाळी गंभीर अपघात झाला.
बारामती : बारामती—पुणे मार्गावर मेडद गावच्या हद्दीत कार आणि बुलेटचा सोमवारी (दि. १६) सकाळी गंभीर अपघात झाला. यामध्ये बारामती एमआयडीसीतील उद्योजकासह बुलेट चालविणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यु झाला. तर तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये उद्योजकाच्या कुटुंबियांचा समावेश आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार आणि बुलेटचा सकाळी अपघात झाला. यामध्ये उद्योजक सुनील हेमराज बोथरा (वय ५०,रा.सध्या रा.,रुई,बारामती. मुळ रा. जगदीप सोसायटी,एरंडवणे) हे त्यांच्या कार ( एमएच ४२— के— ९४४६) मधुन पुण्याहुन बारामतीच्या दिशेने येत होते. तर बुलेटवरील तरुण अरबाज अरीफ बागवान (वय २०, रा. सुपे) हा बारामतीहुन सुपे येथे निघाला होता. मात्र, दोन्ही वाहनांची धडक होउन गंभीर अपघात झाला.यामध्ये उद्योजक बोथरा यांच्यासह शेख या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांना अपघातानंतर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत उपचारासाठी नेण्यात आले. मात्र,उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.
तसेच अपघातामध्ये बोथरा यांच्यासमवेत त्यांच्या कारमध्ये बसलेली यांची पत्नी मनिषा सुनील बोथरा (वय ४५) मुलगा,सौरभ सुनील बोथरा (वय २५),मुलगी महक सुनील बोथरा (वय ११) हे तिघे जखमी झाले आहेत. या तिघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात केवळ मृत आणि जखमींची नोंद झाली आहे.अपघाताची फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसेले यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.
घटनेची माहिती समजताच बोथरा यांचे मेहुणे पुणे येथील काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभय छाजेड यांनी बारामतीमध्ये धाव घेतली. बोथरा हे एमआयडीसीतील बडे उद्योजक होते.त्यांचा एमआयडीसीमध्ये रीक्षा कंपनीला आवश्यक सुटे भाग बनविण्याचा कारखाना आहे.येथील अमेय उद्योग समुहाचे ते प्रमुख होत. मनमिळाउ असलेल्या बोथरा यांच्या अपघाती मृत्युची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.