Pune: पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच; तळजाई परिसरात पंधरा ते वीस गाड्या फोडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:09 PM2023-06-20T12:09:36+5:302023-06-20T12:17:10+5:30
गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून शहरात सुरू
धनकवडी (पुणे) : शहरासह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड झाली असून वनविश वस्ती, तळजाई पठार परिसरातील रस्ता लगत पार्किंग केलेल्या पंधरा ते वीस गाड्यांची अज्ञात्यांनी तोडफोड केली, तोंडावर रुमाल बांधून आलेल्या टोळक्याने धुडगूस घालत ह्या गाड्या फोडल्या आहेत. दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य पुणेकरांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचे सत्र मागील काही दिवसांपासून शहरात तर सहकारनगर, पद्मावती, आंबेगाव पठार परिसरात पाहायला मिळत आहे.
सोमवारी वारजे परिसरात सात गाड्यांची तोडफोड झालेली होती. तसेच सोमवार आणि मंगळवारी असे सलग दोन दिवस तळजाई परिसरात दहशतीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
बांधकाम मजूर, पेंटर, पथारी व्यावसायिक, कचरावेचक, रिक्षाचालक, टेंपोचालक अशा नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह या वाहनांवरच चालतो. मात्र, त्याच वाहनाची तोडफोड झाल्यामुळे आता ते नुकसान कोठून व कसे भरून काढायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
माझी चुलच बंद झाली-
पवन सुरेश मोरे (वय ३१ वर्षे, राहणार तळजाई माता वसाहत, पद्मावती घरी पत्नी आणि दीड वर्षांचा मुलगा) यांनी खाजगी ठिकाणी काम केले मात्र घर व्यवस्थित भागत नाही म्हणून तीनच महिने झाले भाडे तत्वावर रिक्षा चालवत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सात आठ जणांच्या टोळक्याने धुडगुस घालत वाहनांची तोडफोड केली, माझ्या रिक्षाचे यात नुकसान झाले आहे. अगोदर मिळत असलेल्या पैशातून शिपचे पैसे देऊन राहणाऱ्या पैशात कसाबसा घरखर्च चालत आहे. त्यात हे नुकसान आता घर असं चालणार, उसनवारी करून रिक्षाचे काम करावे लागेल तेव्हा कुठे चुल पेटणार, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली.