मोटारीने सात जणांना उडविले
By admin | Published: April 7, 2015 05:33 AM2015-04-07T05:33:05+5:302015-04-07T05:33:05+5:30
राजगुरुनगरमधून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळील उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे मोटारीने सात जणांना उडविले.
राजगुरुनगर : राजगुरुनगरमधून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरील मारुती मंदिराजवळील उतारावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे मोटारीने सात जणांना उडविले. त्यात सातही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी चारच्या सुमारास गावातून मारुती मंदिराच्या उताराला ही मोटार जोरात आली. तिचा धक्का दोघां तिघांना बसला. त्याच वेळी ती आपली बाजू सोडून उजव्या बाजूच्या वैशाली जनरल स्टोअर्सला धडकली. त्यामुळे पुन्हा डावीकडे वळाली आणि वळताना आणखी तीन चार जणांना जखमी केले. तर एक जण या गाडीखाली सापडले. लोकांनी गाडी उचलून त्यांना बाहेर काढले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्कूटरला आणि एका मोटारसायकललाही तिने धडक दिली़ यावेळी जमलेल्या जमावाने चालकाला त्यांनी मारहाण केली़ लोकांनी जखमींना रुग्णालयात हलविले. जगदीश रामनाथ अकुल(वय ६५), अतुल विष्णू सावंत( वय १५), सुरेय्या दगडू तांबोळी(वय ५५) हे राजगुरुनगर येथील रहिवासी यात जखमी झाले. तर शाम सुरेश गोपाळे ( वय २५), गणपत दगडू गोपाळे (वय ७५) आणि अश्विनी सीताराम केदारी (वय ९ ) हे तिघेजण आडगाव( ता. खेड ) आणि विलास बांगर ( वय ३०) हे एकलहरे ( ता-खेड ) अशी जखमींची नावे आहेत़ (वार्ताहर)