बोपदेव घाटात आग लागल्याने मोटार जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 02:53 PM2018-10-30T14:53:30+5:302018-10-30T14:54:39+5:30
पुण्याकडे येत असताना बोपदेव घाटात अचानक मोटारीला आग लावून त्यात मोटार पूर्णपणे जळून खाक झाली.
पुणे : पुण्याकडे येत असताना बोपदेव घाटात अचानक मोटारीला आग लावून त्यात मोटार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने मोटारचालक त्वरीत बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली.
याबाबत अग्नीशामन दलाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद जालिंदर थोपटे (वय ५२, रा़ सासवड) हे मोटारीने सासवडवरुन पुण्याकडे येत होते. साधारण सकाळी पावणे अकराच्या सुमारास ते बोपदेव घाटातून येत असताना एका वळणावर अचानक समोरुन एक गाडी त्यांच्या अंगावर आली. त्यामुळे त्यांनी घाईघाईत आपली मोटार कडेला घेतली. तेव्हा ती डोंगराच्या कडेला असलेल्या चारीत गेली व अचानक गाडीने पेट घेतला.
आग लागलेली पाहताच ते तातडीने गाडीतून कसेबसे बाहेर आले. अग्निशामन दलाला या घटनेची माहिती दिली. कोंढवा अग्निशमन केंद्राची कर्मचारी गणपत पड्ये, योगेश जगताप, फायरमन सोपान कांबळे, तेजस खरिवले, अभिजित थळकर, आपत्तीचे जवान सत्यम चवखंडे, विशाल गायकवाड, प्रदीप कोकरे हे तातडीने घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत गाडी संपूर्णपणे पेटली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारुन आग विझविली. पण तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली.