शहरात दरडोई एक गाडी, तर दीड झाड

By admin | Published: June 5, 2016 04:07 AM2016-06-05T04:07:59+5:302016-06-05T04:07:59+5:30

देशातील वेगाने विकसित होणाऱ्या पुणे शहरातील वाहनांच्या संख्येने ३१ लाखांचा आकडा ओलांडला आहे. तर, शहरातील झाडांनीही ३८ लाखांचा आकडा ओलांडला असून शहरातील २०११च्या

A car per capita in the city, and a half a tree | शहरात दरडोई एक गाडी, तर दीड झाड

शहरात दरडोई एक गाडी, तर दीड झाड

Next

- सुनील राऊत, पुणे

पुणे : देशातील वेगाने विकसित होणाऱ्या पुणे शहरातील वाहनांच्या संख्येने ३१ लाखांचा आकडा ओलांडला आहे. तर, शहरातील झाडांनीही ३८ लाखांचा आकडा ओलांडला असून शहरातील २०११च्या जनगणनेची आकडेवारी पाहता, शहरात माणशी एक गाडी, तर दीड झाड असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एका बाजूला शहरातील वाहनांमुळे प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्षात मात्र शहरात असलेल्या वृक्षसंपदेमुळे शहरातील प्रदूषण अद्याप तरी धोक्याच्या पातळीवर गेले नसल्याने पुणेकरांंसाठी ती समाधानाची बाब समजली जात आहे.
केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रलयाच्या भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था व पुणे महापालिका यांच्या सहभागातून ‘सफर पुणे’ उपक्रमांतर्गत पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणांतील प्रमुख घटकांचे हवेतील २४ तासांचे प्रमाण मोजण्याची चाचणी यंत्रे बसवलेली असून, त्यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.
गेल्या दशकभरात शहराचा विस्तार झपाट्याने झालेला आहे. समुद्रसपाटीपासून ५४० मीटर उंचीवर असून, शहराचे एकूण क्षेत्रफळ २५०.५६ चौरस किलोमीटरवर विस्तारलेले आहे. तर, शासनाच्या २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार शहराची लोकसंख्या ३१ लाख २४ हजार निश्चित करण्यात आलेली आहे. रोजगार तसेच इतर सोयीसुविधांमुळे पुणे शहर गेल्या दशकभरात वेगाने वाढलेले आहे. २००१च्या जनगणनेनुसार ही लोकसंख्या २५ लाख निश्चित करण्यात आली होती. या वेळी शहरातील दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या ही अवघी १० लाख होती. म्हणजेच लोकसंख्या ५ लाखांनी वाढली असली, तरी वाहनांची संख्या मात्र ३ पटींनी वाढली आहे. शहरात दरडोई १ गाडी असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ३ ते ४ वर्षांपूर्वी शहरात वायुप्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून येत होते. मात्र, याच वेळी शहरात वाढत असलेली वृक्षांची संख्या पर्यावरणाला दिलासा देणारी ठरली असून, शहरात दरडोई एक गाडी असली, तरी प्रतिव्यक्ती १.२३ टक्के झाड आहे.

एका व्यक्तीमागे दीड झाड
शहराचे एकूण क्षेत्रफळ २५ हजार ५६ हेक़्टर असून त्या क्षेत्रफळात सुमारे ३८ लाख ६० हजार ५५ वृक्ष आहेत. या झाडांची घनता प्रतिहेक्टर १५४ वृक्ष आहे. तर, प्रतिएकर हे प्रमाण सरासरी ६२ वृक्ष असून माणशी ते १.२३ वृक्ष आहे. शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच टेकड्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे वृक्षांची संख्या कमी होत असली, तरी दुसऱ्या बाजूला वृक्षतोडीवर असलेले कडक निर्बंध तसेच वृक्षारोपणाच्या पद्धतीत झालेला बदल आणि पर्यावरणाविषयी होणारी जनजागृती यांमुळे वृक्षांचे प्रमाण वाढण्यास मदत होत असल्याचे चित्र असून ते पर्यावरणसंवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावीत आहे.

31 लाख
पुणे शहरातील वाहनांच्या संख्येने ३१ लाखांचा आकडा ओलांडला आहे

38 लाख
पुणे शहरातील झाडांच्या संख्येनेही
३८ लाखांचा आकडा ओलांडला आहे

समुद्रसपाटीपासून
540 मीटर
उंचीवर असून शहराचे एकूण क्षेत्रफळ
250.56 चौरस
कि.मी. विस्तारलेले

31 लाख 24 हजार
शहराची लोकसंख्या

अतिसूक्ष्म धूलिकणांचा वाढला आहे धोका
अतिसूक्ष्म धूलिकण २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान आकारमानाचे असतात. हे अतिसूक्ष्म धूलिकण श्वसनामार्फत फुफ्फुसांत खोलवर जाऊन पोहोचतात व फुफ्फुसांच्या रचनेमुळे आतमध्ये दीर्घकाळापर्यंत साठून राहतात.
हे सूक्ष्मकण विविध प्रकारच्या हानिकारक घटकांनी बनलेले असल्यास रक्तात मिसळून रक्त प्रदूषित करतात व आरोग्यावर अतिशय घातक कण असतात. हे कण वातावरणातील प्रदूषण वाढवतात.
टू स्ट्रोक वाहनांमुळे तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे शहरामध्ये या कणांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

प्रदूषण नियंत्रण कायद्याप्रमाणे प्रदूषकांचे प्रमाण सभोवतालच्या हवेत जास्तीत जास्त किती असावे, हे निर्देशित केलेले आहे. सामान्यपणे वायुप्रदूषणाला कारणीभूत असणारे काही घटक व त्या घटकांची मानांकने निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यानुसार शहरातील हवेची स्थिती पुढीलप्रमाणे :
प्रदूषकेऔद्योगिक, रहिवारी व इतर जागाशहराची सद्य:स्थितीकारण
(सर्व परिमाने मायक्रो ग्रँम/घनमिटर)(सरासरी)
सल्फर डायआॅक्साईड ५०३०वाहनांचा धूर, पेट्रोलियम इंधनवापर
नायट्रोजन डायआॅक्साईड४०५०वाहनांमधून बाहेर पडणारा धूर
सूक्ष्म धूलिकण (पीएम १०)६०७०वाहनांमुळे उडणारी धूळ
सूक्ष्म धूलिकण (पीएम २.५)४०५०वाहनांमुळे उडणारी धूळ
कार्बन मोनॉक्साईड (प्रति क्यू,मीटर)२.५१अपूर्ण ज्वलन, वीटभटटया

Web Title: A car per capita in the city, and a half a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.