मोटार चोरून पळणाऱ्या चोरट्याला पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:40+5:302021-05-20T04:12:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्कर भागात रस्त्यातील रस्त्यावर चोरट्याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेलेल्या चोरट्याचा गस्त घालणा-या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लष्कर भागात रस्त्यातील रस्त्यावर चोरट्याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेलेल्या चोरट्याचा गस्त घालणा-या पोलिसांनी पाठलाग करून पकडले. मोटारीतील जीपीएस यंत्रणेवरून पोलीस चोरट्याचा मागोवा घेतला. लष्कर, वानवडी, भैरोबानाला परिसरात एक तास हा थरार रंगला होता.
अभिषेक ऊर्फ पप्पू पवार (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पवार हा सराईत वाहनचोरटा आहे. अनेकदा नशा केल्यावर तो वाहने चोरतो. याप्रकरणी जयंत ज्ञानदेव साळुंखे (वय ४८) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पवार याचा साथीदार पळून गेला आहे.
साळुंखे यांनी कॅम्प परिसरातील साचापीर स्ट्रीट येथे दुपारी पावणेबाराच्या सुमारास गाडी साफ करीत होते. यावेळी पवार व त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांची मोटार पळवून नेली. त्यांनी जवळच्या चार बावडी पोलीस चौकीत धाव घेऊन याची माहिती दिली. पोलीस कर्मचारी हिलाल व संग्राम वरपे त्यावेळी तेथे उपस्थित होते. त्यांच्या मोटारीला जीपीएस यंत्रणा असून त्याचे लोकेशन मोबाईलवर येत असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांना हा प्रकार सांगून त्यांनी दुचाकीवरून मोटारीचा पाठलाग सुरू केला. सुुरुवातीला ही मोटार सोलापूर बाजार येथे गेली. तेथून ती वानवडी बाजारकडे गेल्याचे दिसले. त्यानंतर ती कोंढव्याकडे जात असताना वैभव व संग्राम यांना ती दिसली. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. तेथून ते पुन्हा वानवडी बाजारातून भैरोबानाल्याकडे गेले. तोपर्यंत ही माहिती शहरातील सर्व पोलीस ठाण्यांपर्यंत पोहचली होती. लष्कर बीट मार्शल, वानवडी वाहतूक विभाग आणि वानवडी बीट मार्शल यांनी टर्फ क्लबजवळ ही मोटार अडवली. त्यातील पवार याचा साथीदार पळून गेला. लष्कर पोलिसांनी पवार याला अटक केली आहे.