खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:53 IST2025-01-16T16:52:51+5:302025-01-16T16:53:05+5:30
वीजप्रवाह सुरू असताना हा अपघात तारा तुटल्या, मात्र या तारा गाडीवर किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांवर न पडलायने सुदैवाने जीवितहानी टळली

खडीवरून चाक घसरल्याने कारची जोरदार धडक; लोखंडी खांब वाकून विजेच्या ताराही तुटल्या
लोहगाव : डी. वाय. पाटील रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडले आहे. रस्त्यावर टाकलेली चुरी, खडी अस्ताव्यस्त असल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. अशात आज एका चारचाकीचे टायर खडीवरून घसरले व रस्त्याच्या खाली उतरले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीवर ब्रेक न लागल्याने विजेच्या खांबाला जाऊन धडकली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची चर्चा आहे.
लोहगावकडून जाताना डी. वाय. पाटील रस्त्यावर आज दुपारी चार वाजताच्या दरम्यान इरिटीगा कार (गाडी क्र. एम. एच. १२ व्ही. एफ. ०२२८ ही) वृंदावन पार्कजवळ शुभनिलया सोसायटीसमोरील विजेच्या खांबावर धडकली. धडक इतकी जोरदार होती की, लोखंडी खांब वाकून विजेच्या तारा तुटल्या. वीजप्रवाह सुरू असताना हा अपघात तारा तुटल्या. सदर गाडीवर किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्यांवर पडल्या नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. तारा रस्त्यावर झुकल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. धानोरी वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत वीजप्रवाह खंडित करून वाहतूक सुरळीत केली.
काम रखडल्याने रस्ता बनला मृत्यूचा सापळा
गेल्या सहा महिन्यांपासून डी. वाय. पाटील रस्त्याचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या दीड किमी सदर रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वीच होणे अपेक्षित होते. परंतु, काम योग्य होत नसल्याने ते रखडले. महिन्याभरात होणारे काम सहा महिन्यांनंतर अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे. रस्त्यावरील खडी उखडून अस्ताव्यस्त झाल्याने अनेक अपघात होत आहेत. सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासन दखल घेणार का, असा सवाल विचारला जात आहे. महापालिकेकडून पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी काम थांबवावे, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. मात्र, पाण्याची पाइपलाइनचेही काम अद्याप सुरू झाले नसून, लोहगावातील रस्त्यांचे दारिद्र्य दूर होण्याची चिन्हे दिसत नाही.