पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी गाडीचा कटतोय टोल, फास्ट टॅगचा नवा फ्रॉड समोर…
By नम्रता फडणीस | Updated: January 8, 2025 20:54 IST2025-01-08T20:54:19+5:302025-01-08T20:54:52+5:30
जर सातत्याने आणि ते पण रात्रीच्या वेळेसच टोल कट होत असल्याचे मेसेज तुम्हाला यायला लागले तर

पार्किंगमध्ये लावलेल्या चारचाकी गाडीचा कटतोय टोल, फास्ट टॅगचा नवा फ्रॉड समोर…
पुणे : तुमची कार घराबाहेर पार्क आहे आणि तुमच्या फास्ट टॅगवरून टोल कट झाल्याचा मेसेज मोबाइलवर येतो. एका क्षण तुम्ही गोंधळून जाल आणि चुकून झाले असेल म्हणून दुर्लक्ष कराल .पण जर सातत्याने आणि ते पण रात्रीच्या वेळेसच टोल कट होत असल्याचे मेसेज तुम्हाला यायला लागले तर ! असाच काहीसा प्रकार मनोज शिंगुस्ते या तरुणाच्या बाबतीत घडला आहे.
'फास्ट टॅग माझे आहे, मग कसा काय टोल कट होतो' असा प्रश्न सर्वसामान्यासारखा त्यांनाही पडला आणि एक धक्कादायक बाब समोर आली. टोलनाक्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्यासारखीच कार आणि नंबरप्लेटही एकच असल्याचे दिसले आणि त्यांना धक्काच बसला. कुणीतरी त्यांच्या कारची बनावट नंबरप्लेट लावून फिरत असल्याचे आढळले. टोलनाक्यावरचे कर्मचारी अनेकदा मॅन्युअली फक्त नंबर प्लेटवरून किंवा नंबर टाइप करून वाहनचालकांना सोडत असल्याने ज्याच्या नावावर कार आहे. त्याच्या फास्ट टॅगमधून टोल कापला जात असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. यातून एकप्रकारे फास्ट टॅग फ्रॉड उघडकीस आला आहे.
राज्य सरकारने येत्या १ एप्रिलपासून वाहनधारकांना फास्ट टॅग बंधनकारक केले आहे. मात्र तरुणाला आलेला अनुभव पाहता फास्ट टॅग हा टोलवसुलीसाठी नक्की सुरक्षित आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याविषयी "लोकमत' शी बोलताना मनोज शिंगुस्ते म्हणाले, दि. २ जानेवारीला रात्री १२ वाजता माझ्या घरी असताना पाटस (ता. दौंड जि पुणे), वरवडे सोलापूर टोलनाका (ता.मोहोळ जि सोलापूर) येथून माझी गाडी गेल्याबाबत फास्ट टॅगवर पैसे कट झाले. मी माझ्या फास्ट टॅग पासबुकची यादी पाहिली असता सुमारे दोन महिन्यांपासून माझ्या नंबरची गाडी पाटस टोलनाका येथे पास झाल्याबाबत माहिती लागली. पण माझी गाडी गेल्या दोन महिन्यांत या मार्गाने कधीच गेली नाही. सुरुवातीला फास्ट टॅगचा विषय बँक आणि राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला सांगूनही काहीच पर्याय निघाला नाही. त्यानंतर मी पाटस टोलनाका येथे जाऊन खात्री केली असता कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडील कारवर माझ्या गाडीचा नंबर लावून प्रवास केला असल्याचे दिसले. हा व्यक्ती माझ्या गाडीचा बनावट नंबर लावून रात्रीच्या वेळी पुणे सोलापूर हायवे रस्त्याने पाटस टोलनाका ते वरवडे सोलापूर टोलनाका असा प्रवास करीत आहे. याबाबत मी पाटस टोलनाका येथील सीसीटीव्ही फुटेजदेखील मिळविले आहे. हे असे होत असेल तर माझ्यासारखे असे किती जण फसविले गेले असतील असा प्रश्न पडतो.
यवत पोलिस स्टेशनमध्ये केली तक्रार
एखाद्या गुन्ह्यासाठी जर माझ्या गाडीच्या नंबरप्लेटचा वापर झाल्यास मी अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती यवत पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे केली असून, याबाबतचा तक्रार अर्जही पोलिस स्टेशनमध्ये दिला असल्याचे मनोज शिंगुस्ते यांनी सांगितले. माझी गाडी मोशी आरटीओ कार्यालयाची पासिंग आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी घटना कुठे घडली, मग तिथे जा असे म्हणून मला टोलवले असल्याचे ते म्हणाले.