गाडीला पोलिसी लॉक; वाहनचालकही ‘ब्लॉक’
By admin | Published: December 28, 2015 01:21 AM2015-12-28T01:21:15+5:302015-12-28T01:21:15+5:30
चारचाकी वाहने बिनधास्त रस्त्यावर पार्किंग करा, असा नवा फंडा रुजला होता. वाहतूक पोलीस दुचाकी वाहने बिनधास्तपणे उचलून नेली जात होती.
पिंपरी : चारचाकी वाहने बिनधास्त रस्त्यावर पार्किंग करा, असा नवा फंडा रुजला होता. वाहतूक पोलीस दुचाकी वाहने बिनधास्तपणे उचलून नेली जात होती. पण, चारचाकी वाहनांना कोणी हातच लावत नव्हते, अशी एक समजूत झाली होती. पण, शनिवारी वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांना जॅमर लावून कारवाई केली अन् वाहनचालकांची पळापळ उडाली.
निगडी प्राधिकरणातील विविध अंतर्गत रस्त्यांवर व मुख्य रस्त्यांवरील नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर निगडी शाखेच्या वाहतूक विभागामार्फत कारवाई करण्यात आली. १४ डिसेंबरपासून ही कारवाई सुरू असून, आत्तापर्यंत ७८ वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.
शहराच्या विविध भागांमधील रहिवाशांनी केलेल्या तक्रारींमुळे पोलीस आयुक्तांनी नो पार्किंगमध्ये रस्त्यावर उभ्या असणाऱ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या, पदपथावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निगडीच्या वाहतूक शाखेच्या वतीने प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६, २७, २८, निगडीतील मुख्य रस्त्यांवर, भक्ती-शक्ती चौक परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनांना जॅमर लावण्यात आले. ब्लॅक फिल्मिंग असणे, विनापरवाना वाहन चालवणे अशा गुन्ह्यांनुसार दंड वसूल करण्यात आला. वाहनांच्या मालकांकडून सर्व कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये १४ ते २० डिसेंबरदरम्यान ५३ वाहनांवर, तर २१ ते २६ डिसेंबरपर्यंत २५ वाहनांवर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग बी. मुदीराज यांच्या अंतर्गत करण्यात आली.
नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक हवालदारास अरेरावी करून
शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी निगडी येथे घडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगणक अभियंता अमरजीत सूर्यवंशी (वय ३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)