भरधाव मोटारीने अनेकांना उडविले; दोन जण गंभीर
By Admin | Published: October 14, 2016 05:26 AM2016-10-14T05:26:47+5:302016-10-14T05:26:47+5:30
भरधाव मोटारीने बेदरकारपणे चार मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी
राजगुरुनगर : भरधाव मोटारीने बेदरकारपणे चार मोटारसायकली आणि एका मोटारीला उडविल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाले असून दोघे गंभीर आहेत. राजगुरुनगर- पाबळ रस्त्यावर गुरूवारी रात्री साडेआठ वाजता होलेवाडी वळणावर ही घटना घडली.
पाबळकडून राजगुरुनगरकडे येणाऱ्या जीप (एम. एच १४, डी एम ४९१२) या मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ती भरधाव मोटार तशीच पुढे आली आणि मळूआईमंदिरा जवळ कार (एमएच १२, ई.बी ९९१२) या गाडीवर आदळली. तसेच तेथे असलेल्या तीन मोटारसायकलींना तिने धडक दिली आणि विरुध्द बाजूला नाल्यात पडली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
या वळणावर नेहमी अपघात होतात. गतिरोधक टाकावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र, कारवाई होत नसल्याने अपघातानंतर रात्री नऊ वाजता ग्रामस्थांनी येथे रास्ता रोको केला. सरपंच भिकाजी होले, माजी उपसरपंच रोहिदास होले, राक्षेवाडीचे माजी उपसरपंच नामदेव चव्हाण, वसंत होले, अरुण होले, संतोष होले, माणिक होले, शारदा होले, शाकुबाई होले, प्रभाताई होले आदी त्यात सहभागी झाले होते. रात्री उशीरा पर्यंत हे आंदोलन सुरुहोते. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी ग्रामस्थांना विनंती केल्यावर ते मागे घेण्यात आले.