कारची स्टंटबाजी पडली महागात! बारामतीत दोघांना पोलिसांनी शिकवला धडा, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:41 IST2025-01-28T19:40:52+5:302025-01-28T19:41:26+5:30
काही स्टंट बाज, टुकार वाहनचालक नियमांची पायमल्ली करणारे आढळून आल्यास नागरिकांनी न घाबरता वाहतुक पोलिसांना कळवावे

कारची स्टंटबाजी पडली महागात! बारामतीत दोघांना पोलिसांनी शिकवला धडा, गुन्हा दाखल
बारामती: बारामती शहरातील एमआयडीसी परिसरात बेफाम चालवलेल्या दोन 'स्टंट कारच्या' व्हायरल व्हिडीओने बारामतीकरांचा अक्षरशः थरकाप उडाला. हे व्हिडीओ थेट वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापर्यंत पोहोचले, मग काय? या वाहनांचा वाहतूक पोलिसांचे मर्फतीने शोध घेत अखेर या स्टंटबाजांना बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यादव यांनी चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्यांची माहिती कळवावी असे आवाहन व्हाट्सअप मेसेज द्वारे केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बारामती एमआयडीसी परिसरातील पेन्सिल चौक ते गदीमा चौक या रहदारीच्या रस्त्यावर दोन चारचाकी वाहणांनी स्टंटबाजी करून स्वतःच्या अणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक टाटा पंच तर दुसरी पोलो गाडी असल्याचे दिसत होते. हा स्टंट जर चालकाच्या अंगलट आला असता तर यात अनेकांना जीवही गमवावा लागला असता. वाहतूकीच्या दृष्टीने बारामती शहर सुरक्षित करण्यासाठी वाहतुक पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक उपक्रम राबवून, दंड आकारून, दोरीचे प्रयोग करून, प्रसंगी वाहन चालक आणि नागरीकांचे प्रबोधन करून उत्तम आणि प्रामाणिक काम केले आहे. मात्र या व्हिडीओने बारामतीकरांना धक्काच बसला. व्हायरल व्हिडीओत वाहनांचे नंबर अस्पष्ट दिसत असल्याने वाहतूक शाखेसाठी हे मोठे आव्हान होते. मात्र वाहतूक शाखेने या वाहनांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत अखेर त्या वाहनांचा शोध घेतला. त्यातील एक चारचाकी दौंड तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा दि. २५ जानेवारी रोजी घडला असल्याचे सिद्ध झाले.
कारची स्टंटबाजी पडली महागात! बारामतीत दोघांना पोलिसांनी शिकवला धडा, गुन्हा दाखल#Pune#baramati#police#Carpic.twitter.com/mfHINoQ0Zu
— Lokmat (@lokmat) January 28, 2025
तर दि. २७ रोजी टाटा पंच (एम.एच ४२ बी.ई ७२४७) तसेच वोक्सवॅगन कंपनीच्या पोलो गाडीच्या वाहनचालकांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर आव्हाड( रा. पाटस, ता. दौंड) आणि तेजस मनोज कांबळे (वय २२, रा. -रुई, बारामती) या स्टंटबाजी करणाऱ्यांचे विरोधात बेदरकारपणे वाहन चालविणे चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वाहतूक पोलीस जवान सुभाष काळे,सुधाकर जाधव,अजिंक्य कदम,योगेश कातवारे तालुका पोलीस स्टेशन चे रावसाहेब गायकवाड,ओंकार सिताप आदींनी केली.
बारामतीला वाहतुक कोंडीपासून सुरक्षित करण्यासाठी आणि वाहतुक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक शाखा प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाही काही स्टंट बाज, टुकार वाहनचालक नियमांची पायमल्ली करून शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करतात. मात्र असे प्रसंग आढळून आल्यास नागरिकांनी न घाबरता वाहतुक पोलिसांना कळवावे. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येइल.- चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक