मोटारीने चहाविक्रेत्याला उडवले
By admin | Published: October 14, 2016 04:51 AM2016-10-14T04:51:25+5:302016-10-14T04:51:25+5:30
बेदरकार मोटारचालकाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका चहाविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी घडला.
पुणे : बेदरकार मोटारचालकाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एका चहाविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. डेक्कन पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली आहे.
शंकर पाटीदार (रा. उत्तमनगर, मूळ रा. राजस्थान) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत औताडे (वय ४५, रा. महर्षीनगर) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औताडे एका टुरिस्ट मोटारीवर चालक म्हणून काम करतो. पाटीदार बुधवारी सकाळी रस्त्यावरून चालत जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा कुत्राही होता. पदपथालगत चालत जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारीची त्यांना जोरात धडक बसली. ही धडक एवढी जोरात होती, की हवेमध्ये उंच उडालेले पाटीदार काही मीटर अंतरावर जाऊन रस्त्यावर आपटले.
मोटारीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, काही अंतरावर जाऊन ही मोटार उभी राहिली. चालक औताडे याने नागरिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पाटीदार यांच्या डोक्याला जबर मार लागला, तसेच रक्तस्रावही मोठ्या प्रमाणावर झाला होता. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)