कुत्र्याच्या अंगावरून घातली गाडी; मृत्युस कारणीभूत ठरलेल्या कारचालक महिला डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 11:49 AM2021-08-11T11:49:49+5:302021-08-11T11:50:09+5:30
कोरेगाव पार्कमधील डुंगरसी पार्क सोसायटीत मंगळवारी सकाळी ही घटना वाजता घडली
पुणे : सोसायटीत फिरणार्या कुत्र्याच्या अंगावरुन गाडी घालून त्याच्या मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एका महिला डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोरेगाव पार्कमधील डुंगरसी पार्क सोसायटीत मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.
याप्रकरणी करिष्मा प्रदीप पुणेकर (वय ३२, रा. डुंगरसी पार्क सोसायटी, बंडगार्डन रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि पुणेकर या एकाच सोसायटीत राहतात. सोसायटीतील लोक खायला देतात, म्हणून एक विटकरी रंगाचा कुत्रा सोसायटीच्या गेटजवळ नेहमी फिरत असतो. महिला डॉक्टरांनी त्यांच्या ताब्यातील कार हयगयीने व निष्काळजीपणे चालवून या कुत्र्याला धडक दिली. कुत्र्याच्या तोंडावरुन त्यांच्या कारच्या डाव्या बाजूचे पुढील चाक गेल्याने कुत्रा जखमी झाला होता.
पुणेकर यांनी त्याला उपचाराकरीता प्राण्यांचे डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. कोरेगाव पार्क पोलिसांनी प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमाखाली महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल म्हेत्रे तपास करीत आहेत.