कऱ्हा नदीपात्र झाले चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 02:42 AM2018-07-27T02:42:50+5:302018-07-27T02:43:12+5:30
नदीपात्राची स्वच्छता; खंडोबानगर ते म्हाडा कॉलनीदरम्यान राबविले अभियान
बारामती : बारामती येथील कºहा नदीपात्रातील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नदीपात्रातील काटेरी झुडपे, तसेच प्रवाहात अडथळा ठरणारा राडारोड साफ करण्यात आला; त्यामुळे शहरातील नदीपात्र चकाचक झाले आहे.
१६ ते २२ जुलैदरम्यान नगरसेवक अमर धुमाळ मित्रपरिवाराच्या वतीने या स्वच्छता सप्ताहाचे अयोजन करण्यात आले होते. स्व:खर्चाने चार वर्षांपासून ही मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, स्वच्छता मोहिमेची सुरुवात नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आली. बारामती शहरातून वाहणाऱ्या कºहा नदीपात्रात दरवर्षी झाडे व इतर कचरा होत असल्याने नदीपात्र अस्वच्छतेच्या विळख्यात सापडते. बारामती शहरातील खंडोबानगर येथील कºहा नदीवरील पूल ते म्हाडा कॉलनीदरम्यान नदीपात्रात बाभळी व इतर काटेरी वनस्पतींचे साम्राज्य वाढले आहे.
नदीला पूर आल्यास पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी पात्रालगतच्या घरांमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याअनुषंगाने अमर धुमाळ यांनी या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. त्यामुळे चार वर्षांपूर्वी अमर धुमाळ मित्र परिवाराच्या वतीने स्वखर्चाने जेसीबी यंत्राच्या साह्याने ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.
कºहा नदीपात्रासह बारामती शहरातील अनेक भागांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन नदीपात्रासह इतर भाग चकाचक झाला.
यावेळी नगरसेवक अमर धुमाळ यांनी सांगितले, की माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा
उपक्रम सुरू केला आहे. या स्वच्छता अभियानाचे हे पाचवे वर्ष आहे.
नदीमध्ये अस्वच्छता, झाडेझुडपे आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. पर्यावरणीयदृष्टीने नदीची स्वच्छता आणि नदीचे आरोग्य अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे वारंवार अशा स्वरुपाच्या स्वच्छता मोहिमेची आवश्यकता आहे. नदीपात्राची स्वच्छता राखली गेल्यास सर्वांनाच शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. पाणी जेवढे स्वच्छ राहील तेवढेच आसपासच्या नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहील.