कटफळ येथे तरुणाला पेट्रोल टाकून पेटविले, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:05 PM2018-03-04T14:05:06+5:302018-03-04T14:05:06+5:30
पहिला वाद मिटवून घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बाहेर नेऊन एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२) रात्री घडला.
सांगवी : पहिला वाद मिटवून घेण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बाहेर नेऊन एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.२) रात्री घडला. याप्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार दत्तात्रय झगडे (वय २१, रा. कटफळ, ता. बारामती) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून आरोपी नितीन माकर, धनंजय माकर (दोघे रा. कटफळ, ता. बारामती), अमोल शिंदे (वंजारवाडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी कटफळ पियाजो कंपनीच्या पाठीमागील तळ्याजवळ फिर्यादी झगडे रात्री नऊच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी जात होते. यावेळी आकाश सर्व्हिसिंग सेंटर येथे फिर्यादिस नितीन माकर याने हाक मारून थांबविले. आरोपी धनंजय माकर याने फिर्यादीला आपला पहिला वाद मध्यस्तीकडे जात मिटवून घेण्याच्या बहाण्याने फिर्यादीला गाडीवर नेले. नितीन माकर हा स्कूटीवर होता. तर धनंजय माकर व अमोल शिंदे हे बुलेटवर होते. सर्वजण बाहेर रानात तळ्याच्या आत गेले. त्याठिकाणी अमोल शिंदे याने हातात असलेली बिअरची बाटली नितीन माकर याने घेतली. त्याने ती फिर्यादीच्या डोक्यात मारली. यामध्ये फिर्यादीला चक्कर आली. त्यावेळी तिघांनी मारहाण केली. त्यानंतर नितीन माकर व धनंजय माकर यांनी सिगारेट ओढण्यासाठी काडी पेटवून नितीन माकर याची सिगारेट पेटवली. त्यावेळी धनंजय माकर याने खाली वाकवून पेट्रोलची बाटली उचलून झगडे याच्यावर ओतून त्यांना पेटवले.
जखमींसाठी उपचार सुरु
आरोपी निघून गेल्यानंतर झगडे यांनी आपल्या साथीदारांना फोन द्वारे झालेला प्रकार सांगितला. फिर्यादीच्या छातीला भाजल्याने साथीदारांसह पोलिसांनी सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.