‘मेरा रेशन ॲपवर’ आता मिळणार कार्डधारकांना सर्व माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:41+5:302021-03-23T04:11:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात २ हजार ७८९ दुकानदार असून तब्बल ८ लाख ९३ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात २ हजार ७८९ दुकानदार असून तब्बल ८ लाख ९३ हजार रेशनकार्ड आहेत. सध्या धान्य कधी येते, वाटप केव्हापासून सुरू होणार किंवा काही तक्रारी असल्यास रेशनकार्डधारकांना सहज माहिती उपलब्ध होत नाही. परंतु आता शासनाच्या ‘मेरा रेशन ॲपवर’ घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे.
रेशनकार्डधारकांना आपल्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यावर शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या तक्रारीसुद्धा करता येणार आहेत. एवढेच नव्हे, तर शिधापत्रिकाधारकाने स्वस्त धान्याची उचल केली किंवा नाही, त्याच्या नावावर इतरांनी तर धान्याची उचल केली नाही ना, त्यांची शिधापत्रिका रद्द तर झाली नाही ना याची चाचपणीसुद्धा या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. आजकाल जवळपास सर्वच जणांकडे अँड्राॅईड मोबाईल आहेत. त्यामुळे या ॲपच्या मदतीने स्वस्त धान्याची माहिती घेण्यास मदत होणार आहे.
---
तक्रार ॲपवर नोंदवा
- मेरा रेशन ॲपवर शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या तक्रारीसुद्धा नोंदविता येणार आहेत. या ॲपसंदर्भात अद्याप जिल्हा पुरवठा विभागाला कसल्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूृचना प्राप्त होताच यावरील तक्रारींचीसुद्धा दखल घेतली जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्वस्त धान्य देण्यास टाळाटाळ, कमी धान्याच्या तक्रारी, परस्पर धान्याची विल्हेवाट, स्वस्त धान्याची काळ्याबाजारात होत असलेली विक्री, आदीसंबंधी तक्रारी शिधापत्रिकाधारकांना या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहेत.
......
ॲपसंदर्भात कोणातीही आदेश नाही
शासनाकडून अद्याप मेरा रेशन ॲपसंदर्भात कोणतीही माहिती, पत्र अथवा आदेश आले नाही. सूचना प्राप्त होताच याची अंमलबजावणी केली जाईल.
- भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी.
---
क्लिकवर मिळणार ही माहिती
शिधापत्रिकाधारकांना मिळणारे धान्य, जवळपास असलेल स्वस्त धान्य दुकान, स्वस्त धान्य दुकानातून उचल केलेल्या स्वस्त धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र आहे की अपात्र यासंबंधीची माहिती, तसेच कोणत्या महिन्यात शिधापत्रिकेवर कोणते धान्य उपलब्ध करून देण्यात आले याची माहिती मिळणार आहे.
--
जिल्ह्यातील एकूण शिधापत्रिका - ८ लाख ९३ हजार
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका - ५ लाख ३४ हजार
अंत्योदय शिधापत्रिका - ४८ हजार ७४४