खामगाव आरोग्य केंद्रासाठी कार्डियाक अँबुलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:40+5:302021-04-17T04:10:40+5:30
खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या दहा गावांमध्ये दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांचा समावेश आहे. याचबरोबर यवत, खामगाव ही ...
खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या दहा गावांमध्ये दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांचा समावेश आहे. याचबरोबर यवत, खामगाव ही मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. लसीकरण बरोबरच विविध उपाययोजना करण्याबाबत काल (दि.१५) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस वैशाली नागवडे, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्य सुशांत दरेकर, सदस्या निशा नीलेश शेंडगे, विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी, आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रुग्ण नेत असताना ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्णांची प्रकृती आणखी खालावत असल्याचा मुद्दा समोर आला.
यावेळी दहा गावातील ग्रामपंचायतींनी १४ वा वित्त आयोग व स्थानिक विकास निधीमधून निधी देऊन रुग्णवाहिकेसाठी रक्कम जमा करून खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे ठरले. यावेळी ग्रामपंचायतींनी निधी देण्यासाठी प्राथमिक संमती दिली.
अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना देखील विमा योजनेचा लाभ द्या : वैशाली नागवडे
अंगणवाडी सेविका व आशासेवकांची कोरोनाच्या आजाराच्या सर्वेबाबत आढावा बैठक पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांनी आयोजित केली होती. यावेळी कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाने विमा योजना देऊ केली आहे. मात्र विमा योजना देताना अंगणवाडी सेविका व आशा सेविकांना यातून वगळण्यात आले आहे, अशी खंत सेविकांना वैशाली नागवडे यांच्याकडे व्यक्त केली.
वैशाली नागवडे यांनी तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधत कोरोना आजाराच्या साथीत अंगणवाडी व अशा सेविका यांना लोकांमध्ये जाऊन काम करावे लागत असल्याने त्यांचा जीव धोक्यात घालत आहेत. शासनाने त्यांना देखील विमा योजना देऊ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस वैशाली नागवडे यावेळी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली.