लसीकरणाआधी हवी दक्षता, अन्यथा येईल चक्कर, अशक्तपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:11 AM2021-05-10T04:11:06+5:302021-05-10T04:11:06+5:30
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात १ मेपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात ...
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात १ मेपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे. परंतु, तरीही लसीकरणाबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. लस कुणी आणि कधी घ्यावी, लस घेण्याआधी काय काळजी घ्यावी, लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत डॉक्टरांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला.
जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले, ''लस घेण्याआधी पौष्टिक आहार घ्यावा लागेल. हळद, आले, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण फळे, कडधान्ये, शेंगा यांचा आहारात समावेश करा. जंकफूड, धूम्रपान व मद्यपान करणे टाळावे. कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ खाणे टाळावे. पुरेशी झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लस घेण्यासाठी रिकाम्या पोटी जाऊ नका. कारण लस घेतल्यानंतर अशक्तपणा किंवा क्वचित चक्कर आल्यासारखे वाटेल. इंजेक्शन दिलेल्या जागी वेदना होणे किंवा सूज येऊ शकते. थकवा, ताप आल्यास घाबरून जाऊ नका. डॉक्टरांनी दिलेली औषध घ्या.”
डॉ. नगरकर म्हणाले, ''लसीकरणानंतर धूम्रपान किंवा मद्यपान टाळा. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी होईल. लसीकरणानंतर स्ट्रॉबेरी, चेरी, संत्री, हिरव्या भाज्या, टोमॅटो यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. फायबरयुक्त खाद्यपदार्थ खावेत, यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळेल. फळे, काळ्या मनुका, आणि अंडी यांसारखे व्हिटॅमिन सी आणि डी असलेले पदार्थ घ्या. निरोगी आहार प्रतिकारशक्तीला चालना देईल आणि शरीरातील जळजळ कमी करेल. पुरेसे पाणी प्या. याशिवाय लसीकरण करून घेतल्यानंतरही कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करा. नियमित हात स्वच्छ धुवा, तोंडावर मास्क लावा आणि सामाजिक अंतर राखा.”
-----
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांना कोविड-१९ ची लस अतिशय सुरक्षित असल्याची खात्री करून यूएसएमध्ये ही लस दिली जात आहे. या लसीमुळे मुलांच्या शरीरातही अण्टीबॉडीज वाढत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, भारतात गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या मातांबद्दल कोणताही अभ्यास झालेला नाही. त्यामुळे भारत सरकारने कोरोना लसीकरणातून गर्भवती मातांना वगळले आहे. याशिवाय ज्या महिला गर्भारपणाची योजना आखत आहेत, अशा महिलांनी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लस घेणे गरजेचे आहे.
- डॉ. राजेश्वरी पवार, ज्येष्ठ प्रसूतिशास्त्रज्ञ
------
मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचा आजार असल्यास लस घ्यायला पाहिजे का, काही विपरित परिणाम होतील का, अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे लस घेणे बहुतेक लोक टाळत आहेत. पण कुठलाही गंभीर आजार असल्यास कोविड-१९ ची लस घ्यायला हरकत नाही. परंतु, लस घेण्याआधी डॉक्टरांशी चर्चा करा. कुठल्याही आजारावर काही औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लसीकरण करून घ्या. औषधांमुळे लसीकरणात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घ्या. एखाद्याला गंभीर आजार असल्यास किंवा शस्त्रक्रिया झालेली असल्यासही लस घेता येते. परंतु, डॉक्टरांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्या. मात्र, आपल्याकडे मोनोक्लोनल ॲंटिबॉडीज असल्यास लस घेणे टाळा.
- डॉ. संजय नगरकर, जनरल फिजिशियन