करिअर आणि इंडस्ट्री ४.०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:47+5:302021-08-26T04:12:47+5:30

औद्योगिक क्रांतीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगायचे तर साधारणपणे सन १७७० मध्ये प्रथमच मानवाने केवळ हाती कामापासून दूर जात मशीनचा वापर ...

Career and Industry 4.0 | करिअर आणि इंडस्ट्री ४.०

करिअर आणि इंडस्ट्री ४.०

googlenewsNext

औद्योगिक क्रांतीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात सांगायचे तर साधारणपणे सन १७७० मध्ये प्रथमच मानवाने केवळ हाती कामापासून दूर जात मशीनचा वापर करून कामे सुरू केली. ज्यात पाण्यापासून तसेच वाफेपासून ऊर्जा निर्माण करून काम करणारी मशिनरीज वापरली जाऊ लागली. त्याला पहिली औद्योगिक क्रांती अर्थात इंडस्ट्री १.० म्हणून संबोधले जाते. त्यानंतर साधारणपणे शंभर वर्षांनी विजेचा शोध लागला. त्यामुळे ऑटोमेशन व असेम्ब्ली लाईन तंत्रज्ञान अस्तित्वात आले. त्याच्या आधारे मोठ्या प्रमाणात उत्पादन निर्मिती सुरू झाली. त्यास दुसरी औद्योगिक क्रांती अर्थातच इंडस्ट्री २.० असे संबोधले जाते. त्यानंतर साधारणपणे १०० वर्षांनी १९७० च्या आसपास संगणकाचा वापर सुरू झाला. संगणकाने नियंत्रित केल्या जाणाऱ्या मशिनरीज अस्तित्वात आली. या सीएनजी मशिन्ससाठी गरजेनुसार प्रोग्रॅम करून मोठ्या प्रमाणात व जास्त अचूकतेने उत्पादन करणे शक्य झाले. तसेच, संगणकाचा वापर विविध मार्गाने उत्पादन निर्मितीत सुरू झाला. त्यालाच तिसरी औद्योगिक क्रांती अर्थातच इंडस्ट्री ३.० असे संबोधले जाते.

इंडस्ट्री ४.० मध्ये संपूर्ण उत्पादन शृंखलाच ऑटोमेट केली जात आहे. आपण ऑटो फॅक्टरीचे उदाहरण घेतले तर तिथे रोबोटिक मशीनच शॉप फ्लोरवर सर्व असेम्ब्लीचे काम करतात, रोबोटिक मशीनच फिटिंग, वेल्डिंग, वगैरे व्यवस्थित झाले आहे किंवा नाही. तसेच त्याचे टेस्टिंग आणि पेंटिंग सुध्दा रोबोटिक मशीनच करतात. तसेच सर्व डीलर नेटवर्क आणि सप्लाय नेटवर्क सुद्धा विविध टप्प्यांवर अनेक सेन्सर वापरून इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ‘ईआरपी’ तंत्रज्ञानाद्वारे जोडले जाते. त्यामुळे जशी विक्रीची मागणी बदलते त्याप्रमाणे संपूर्ण उत्पादन चेन स्वत:मध्ये बदल करून घेते. मागणी वाढली तर फॅक्टरी सिस्टिम उत्पादन वाढवते. त्यासाठी लागणारे संपूर्ण कच्चा माल ऑर्डर करण्यापासून ते असेम्ब्ली लाईनची सर्व मशीन आपोआप री-प्रोग्रॅम केली जाऊ शकतात. त्यामध्ये विक्रीच्या डेटाचा अभ्यास करून प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस वापरला जातो. उद्या किती उत्पादन करावे लागेल त्याबाबतचा आज अंदाज बांधून संपूर्ण प्रोडक्शन बॅच साईझचे नियोजन केले जाते.

इंडस्ट्री ४.० मध्ये रोबोटिक्स, आर्टीफिशिएल इंटेलिजन्स (एआय), प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिस इत्यादी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्यामुळे ऑटोमेशनची पातळी खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. सध्या तर काही नवीन आधुनिक कार अनेक सेन्सरसह युक्त आहेत. त्यांचा वापर होत असतानाच सतत सर्व डेटा जमा करून कंपनीच्या सर्व्हरवर पाठवतात; त्याचा अभ्यास करून कंपनीला प्रत्येक कारची संपूर्ण माहिती कळते. त्याचप्रमाणे काही बिघाड होणार असेल तर प्रेडिक्टिव्ह ॲनालिसिसच्या आधारे आधीच कळू शकते. त्यामुळे याबाबत ग्राहकाला सूचित केले जाते. काही बिघाड झालाच तर काही मिनिटांतच सर्व्हिस सेंटरमधून इंटरनेटद्वारे वाहनातील सर्व बिघाडासंबंधित माहिती अभ्यासता येते. त्यानुसार बिघाड दुरुस्त करण्यास मदत होते.

इंडस्ट्री ४.० मध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) चा वापर केला जात आहे. ज्यात विविध सेन्सर असलेली इंटेलिजन्ट मशीनचे नेटवर्कच असते. ही सर्व मशीन एकमेकांशी बोलू शकतात, स्वत:तील बिघाड समजून घेऊन दुरुस्त देखील करू शकतात. या सर्व मशीन्समधून निर्माण होणारा बिगडेटा आणि एआय तंत्रज्ञानाने व्यवस्थित अभ्यासून प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स पण करता येतो. या अभ्यासामुळे प्रोडक्शन लाईनमधील मशीन उद्या ब्रेकडाउन होणार असल्याचे आधीच ओळखता येते व बिघाड होण्याआधीच तो टाळता येतो. संपूर्ण सप्लाय चेनच ऑटोमेटेड झाल्यामुळे आता वेअरहाऊस पासून ते ट्रान्सपोर्ट सिस्टिमपासून सर्व गोष्टींचे अधिक प्रभावशाली नियोजित करता येते. कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग, बिग डेटा, प्रेडिक्टिव्ह ॲॅनालिसिस ह्या येत्या काळातील खूप महत्वाच्या गोष्टी ठरणार ह्यात शंकाच नाही. त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचे ज्ञान संपादन करणे नक्कीच उपयोगी ठरणार आहे. जसजसा आयओटीचा वापर वाढू लागेल, तसतसे या विषयातील रोजगार संधीदेखील वाढत जाणार आहेत.

- दीपक हर्डीकर, संगणकतज्ज्ञ, पुणे

चौकट

विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० मुळे करियरसाठी देखील विविध संधी उपलब्ध होत आहेत. कंट्रोल सिस्टिम इंजिनीअर, ऑटोमेशन इंजिनियर, डेटा सायन्स, रोबोटिक्स इंजिनियर, आयटी सोल्युशन आर्किटेक्चर, यूआय ॲण्ड यूएक्स डिझायनर इत्यादी विषयांतील रोजगारांच्या संधी येत्या काही काळात उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय विद्यार्थी कारकिर्दीच्या कोणत्याही टप्प्यावर असले, तरी सतत त्यांनी अपस्किलिंग करीत राहणे महत्त्वपूर्ण आहे. इंडस्ट्री ४.० मध्ये सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान अंतर्भूत होत असल्याने आवश्यक ती सर्व तंत्रज्ञान व कौशल्ये सतत आत्मसात करणे यापुढे अनिवार्य ठरणार आहे.

Web Title: Career and Industry 4.0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.