ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील करिअरच्या वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:35+5:302021-04-22T04:09:35+5:30
अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे : १) प्रमाणपत्र अभ्यासक्रम २) पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम ३) एम. फील अभ्यासक्रम ४) पीएच.डी. अभ्यासक्रम ...
अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे :
१) प्रमाणपत्र अभ्यासक्रम
२) पदवी अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रम
३) एम. फील अभ्यासक्रम
४) पीएच.डी. अभ्यासक्रम
काेणत्याही प्रकारच्या सामाजिक बांधणीत ग्रंथालय या माहिती केंद्राचे स्थान महत्त्वाचे असते. अधिकृत शिक्षण व्यवस्था ज्यात शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ याचा अंतर्भाव होतो. तसेच संशोधन केंद्र, सार्वजनिक ग्रंथालये, राष्ट्रीय साहित्यिक व प्रकाशित साधने जतन करणारी राष्ट्रीय पातळीवरील केंद्रे, वर्तमानपत्रे, दूरदर्शन केंद्रे, आकाशवाणी, सरकारी यंत्रणेमधील माहिती पुरविणारी केंद्रे, व्यापारी, शेतकरी, वैद्यकीय, अभियांत्रीकी, प्रशिक्षण देणा-या विविध संस्थांचा समावेश करता येईल. प्रत्येक ठिकाणी ग्रंथालये किंवा माहिती केंद्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात.
या सर्व ठिकाणी माहिती योग्य वेळात योग्य व्यक्तीस देण्यासाठी अधिकृत अभ्यासक्रम नेमले आहेत. अन्यथा आजच्या संगणकीय माहिती युगात ग्रंथालये व तत्सम केंद्रे यांची गरज काय असा प्रश्न नक्की पडू शकतो. गुगल किंवा अनेक शोध इंजिने सर्वांच्या दिमतीस आहेत. पण विविध खाद्यपदार्थाच्या रेलचेलीत तब्येतीस भावणारे व योग्य असणारा आहार सांगणारे आहारतज्ज्ञ (डायटेशियन) आणि तब्येत तंदुरूस्त ठेवण्यासाठी मार्गदर्शन देणारे जिम इन्स्ट्रक्टर यांची जी भूमिका तीच भूमिका आजच्या माहिती स्फोटातील युगातील प्रशिक्षित ग्रंथपाल, माहिती आधिकारी, प्रलेखन अधिकारी, संचालक (अशी अनेक पदनामे या क्षेत्रात आज आढळून येतात) यांची आहे.
माहिती व माहिती स्रोतांचे संकलन, नियोजन, आदानप्रदान व भावी पिढयांसाठी जतन या मूळ भूमिकेतून सर्व अधिकृत अभ्यामक्रमात या शास्त्राचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणाच्या स्तरानुसार संबंधित इच्छुक उमेदवारास व्यवसायाची संधी उपलब्ध होऊ शकते. शैक्षणिक, सार्वजनिक, राष्ट्रीय, संशोधन केंद्रे, बॅंका, औद्योगिक केंद्रे या ठिकाणी ग्रंथालय शिपाई, ग्रंथालय परिचर, ग्रंथालय सहायक, ग्रंथालय लिपीक, ग्रंथपाल, प्रलेखन अधिकारी, माहिती अधिकारी अशा अनेक बिरुदावली असणा-या पदांवर आकर्षक वेतनावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
संगणक, माहिती व संप्रेषण तंत्राच्या प्रगतीचा ग्रंथालयाच्या व माहिती केंद्रांच्या संग्रहावर, सेवांवर, माहितीस्त्रोतांवर आमूलाग्र परिणाम झाला आहे. यामुळे यासंबंधीचे ज्ञानही उमेदवारांना अभ्यासक्रमातून देण्यात येते. ग्रंथालय व माहितीशास्त्राचे अभ्यासक्रम पूर्ण करणारे उमेदवार संबंधित शास्त्राचे अध्यापनही (विहीत अर्हता पूर्ण झाल्यावर) करू शकतो. ग्रंथपालन व माहितीशास्त्राचे दहावी-बारावीनंतर प्रमाणपत्र अभ्यासक्रम तर कला, वाणिज्य , विज्ञान पदवी प्राप्त केल्यानंतरही विविध अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. त्याचप्रमाणे उच्चस्तरावरील अभ्यासक्रम त्या त्या कोर्सेसच्या अर्हतेनुसार करता येतात.
भारतातील नामांकीत विद्यापीठे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवीतात. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांसारखे अजून काही मुक्त विद्यापीठे ग्रंथालय माहितीशास्त्रातील संपर्क अभ्यासक्रम चालवितात.
‘वाचन समाज’ (Reading Society) म्हणजे सुशिक्षीत, सुविचारी समाज घडविण्यासाठी वाचन करून माहिती ग्रहण करून शास्त्रीय व डोळस विचार करणा-यांना घडविण्यासाठी समृद्ध ग्रंथालये व माहिती केंद्रे चालविणे गरजेचे आहे. त्यासाठी कुशल, अभ्यासू, तत्वज्ञ मैत्र करणारा ग्रंथपालही निकडीचा.
कोविडसारख्या संकटकाळीसुद्धा आधुनिक तंत्राने गरजवंताच्या माहितीच्या गरजा अनेक ठिकाणी ग्रंथालयाने पुरविल्या आहेत. मंदीच्या काळातही ग्रंथालय क्षेत्रात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ग्रंथालये असेपर्यंत ग्रंथपाल हवेत.
- अपर्णा राजेंद्र , उपग्रंथपाल
जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र, (जयकर ग्रंथालय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
पुणे