पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:09+5:302021-06-24T04:09:09+5:30

खनिज तेलाच्या साठ्यामधील उत्पादनामध्ये सध्या घट दिसून येत आहे. याचे कारण सध्याचे तंत्रज्ञान, ज्याचा वापर करून, खडकातील उपलब्ध ...

Career Opportunities in Petroleum Engineering | पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी

पेट्रोलियम इंजिनिअरिंगमधील करिअरच्या संधी

googlenewsNext

खनिज तेलाच्या साठ्यामधील उत्पादनामध्ये सध्या घट दिसून येत आहे. याचे कारण सध्याचे तंत्रज्ञान, ज्याचा वापर करून, खडकातील उपलब्ध साठ्यातील फक्त २५ ते ३० टक्के तेलाचे आपण उत्पादन करू शकतो. उर्वरित सर्व तेल अजूनही खडकांमधील छिद्रांमध्ये मध्ये शिल्लक आहे. हे तेल बाहेर काढणे हे कष्टाचे, जिकिरीचे असून या कामासाठी भरपूर आर्थिक गुंतवणूक, तसेच उत्तम अभियांत्रिकी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

भारतातील सार्वजनिक, तसेच खासगी क्षेत्रातील तेल कंपन्या भारताबाहेर ज्या ठिकाणी तेलसाठे आहेत, तेथे आपले व्यवसाय वाढवत आहेत. या व्यवसाय वृद्धीमध्ये दर्जेदार मनुष्यबळ खूप महत्त्वाची भूमिका निभावत आहे. पेट्रोलियम अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील अनेक जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था या मागणीची पूर्तता करीत आहेत. त्यात आयएसएम धनबाद, पीडीपीयू, गुजरात, यूपीईएस देहरादून आणि एमआयटी डब्ल्यूपीयू पुणे या काही शैक्षणिक संस्थांचा समावेश करता येतो. या संस्थामधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ओएनजीसी, इंडियन ऑइलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या आकर्षक सेवा अटींसह उत्कृष्ट वेतन देतात. याव्यतिरीक्त खासगी क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.

पेट्रोलियम अभियांत्रिकीचा अभ्यास केल्यानंतर, विद्यार्थ्यांना भारतासह परदेशातही एक उत्तम पगार मिळतो. हे एकमेव क्षेत्र आहे जेथे नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या (एमएनसी) नवीन पदवीधरांची नेमणूक कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून करतात. या क्षेत्रातही नाव कमावण्यासाठी कष्ट, सचोटी तसेच कठीण क्षणी निर्णय घेण्याची क्षमता, जग भ्रमंतीची तयारी या गुणांची नितांत आवश्यकता आहे.

तेल उत्खनन हे काळजीपूर्वक काम करण्याचे क्षेत्र असून त्यात अनेक धोकेही आहेत म्हणूनच या सर्व कंपन्या आपल्या कर्मचारी वर्गाला उत्तम सुरक्षा प्रशिक्षण देऊनच कामावर रुजू करून घेतात. पेट्रोलियमच्या मुख्य अभ्यासक्रमात भू-विज्ञान, ड्रिलिंग, उत्पादन अभियांत्रिकी यातील सखोल ज्ञानाचा तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन, पेट्रोलियम वित्त आणि अर्थशास्त्र तसेच पाइपिंग अभियांत्रिकी या उदयोन्मुख क्षेत्रांमधील अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असतो. या क्षेत्रात पेट्रोलियम अभियंता, तज्ञ म्हणून काम करुन चांगले करिअर करता येऊ शकते.

- डॉ. राहुल जोशी, पेट्रोलियम इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ

Web Title: Career Opportunities in Petroleum Engineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.