कलाकाराची दखल योग्य वेळी घ्यावी - डॉ. सलील कुलकर्णी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:28 AM2018-10-06T02:28:53+5:302018-10-06T02:29:43+5:30
डॉ. सलील कुलकर्णी : ‘संगीत साधना पुरस्कार’ प्रदान सोहळा
पुणे : आपल्याकडे आजपर्यंत कोणत्याही कलाकारांचे जिवंतपणी एखाद्या व्यक्तीच्या नावाने पुरस्कार देऊन कौतुक केले नाही. या पुरस्काराची थैली व्यक्तीला अशावेळी दिली जाते, जेव्हा त्याला या थैलीचा काहीच उपयोग नसतो. मानपत्र अशाकाळात दिले जाते, ज्यावेळी त्या माणसाची दृष्टी काम करत नसते. त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या कामाची दखल ही योग्य वेळी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले.
ग्लोबल स्टार फाऊंडेशन आणि इंडियन टॅलेंट सर्च अॅकॅडमी आयोजित संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी संगीत साधना पुरस्कार समारंभ संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांना संगीत साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच आदर्श शाळा पुरस्कार पुणे पब्लिक स्कूलला देण्यात आला आणि आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने जेजुरीतील जिजामाता शाळेतील मुख्याध्यापिका सुनीता सावंत यांना सन्मानित करण्यात आले. आदर्श शिक्षक पुरस्कार मुक्तांगण इंग्लिश स्कूलमधील श्रीमती बापट यांना देण्यात आला. यावेळी वीरेंद्र चव्हाण, डी. जी. शिंदे, तेजस चव्हाण, नितीन ढेपे, तन्मय देवचक्के, अनुराधा हाटकर आदी उपस्थित होते. उतारवयात पुरस्कार मिळून उपयोग काय? याच कलाकारांना जर त्यांच्या प्रगतीच्या काळात पुरस्कार दिले तर ही मंडळी त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा अगदी सहजपणे पार करू शकतील, अशी भावना डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
हा सन्मान अभिषेकी घराण्याचा...
आजचा हा सन्मान माझा नसून अभिषेकी घराण्याचा आहे. सलीलच्या सांगीतिक वाढीचा मी साक्षीदार आहे. डॉक्टरकीतून संगीताकडे आणि संगीताकडून गायकीकडे असे त्यांचे विविध पैलू सांगीतिक वाढ होताना पाहिले आहेत. मला त्यांच्या गायनाचा नेहमीच अभिमान आहे. त्यांची मी बरीचशी गाणी गायिली आणि त्यांच्या प्रत्येक गाण्यातून मी नवीन काही शिकलो आहे, असे शौनक अभिषेकी यांनी सांगितले.