करिअर निश्चित करून अभ्यास करावा
By admin | Published: July 4, 2017 04:17 AM2017-07-04T04:17:42+5:302017-07-04T04:17:42+5:30
प्रथमत: विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे निश्चित करून, त्या दृष्टीने आवश्यक विषयांची निवड करून अभ्यास करावा,
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रथमत: विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे निश्चित करून, त्या दृष्टीने आवश्यक विषयांची निवड करून अभ्यास करावा, विविध विषयातील संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांना त्यातून आनंद मिळतो, असे प्रतिपादन सप्तर्षी क्लासेसचे संचालक अमित नवले यांनी केले.
लोकमत व सप्तर्षी क्लासेसतर्फे आयोजित कोथरूड येथील एमईएस आॅडिटोरियम येथे आयोजित अकरावी सायन्सला प्रवेश घेतलेल्या-घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेत अमित नवले बोलत होते. नवले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अकरावी अभ्यासक्रम व जेईई, नीट यांसारख्या प्रवेशपूर्व परीक्षांचा ताण न घेता योग्य नियोजन करून अभ्यास केला पाहिजे, काही कोचिंग क्लासेसकडून जेईई, नीट, सीईटी या पूर्वपरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे, मात्र विद्यार्थी व पालकांनी गोंधळून जाण्याची गरज नाही.
करिअर तज्ज्ञ प्रा. विजय नवले यांनीही या वेळी सायन्समधील करिअरच्या संधीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. प्रा. विजय नवले म्हणाले की, करिअर ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, आवड, क्षमता आणि पात्रता ही करिअर निवडीची त्रिसूत्री आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली आवड, क्षमता आणि पात्रता लक्षात घेऊन ध्येयाकडे वाटचाल करावी, फक्त प्रवेश घेणे म्हणजे करिअर नाही, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. या वेळी त्यांनी करिअर निवडीसंदर्भातील काही किस्से आणि उदाहरणे सांगितली. शेवटी विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांना अमित नवले व प्रा. विजय नवले यांनी उत्तरे दिल्याने विद्यार्थी व पालकांच्या मनातील शंका दूर झाल्या. सप्तर्षी क्लासेसच्या संचालिका शिल्पा नवले यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
मार्गदर्शन कार्यशाळेचे सूत्रसंचालन मयूर टण्णू यांनी केले.
नियोजनबद्ध अभ्यास व योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अकरावी, बारावीच्या परीक्षांसह प्रवेशपूर्व परीक्षामध्येही चांगले गुण मिळवता येतात. प्रथमत: आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे निश्चित करूनच ध्येयाकडे वाटचाल करावी, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर ताणही येत नाही.
- अमित नवले, संचालक, सप्तर्षी क्लासेस
सर्वच क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत, परंतु संधी ही कार्यक्षेत्रावर अवलंबून नसते, तर ती तुमच्या कार्यक्षेत्रातील कर्तृत्वावर अवलंबून आहे. मी कोण होणार, यापेक्षा मी काय करणार, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.
- प्रा. विजय नवले, करिअर मार्गदर्शक