काळजीवह..! पुणे जिल्ह्यातील भूजल साठे जीवाणूंनी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 12:08 PM2019-03-23T12:08:40+5:302019-03-23T12:20:03+5:30
पुणेकर तसे स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत तसे चांगलेच जागरुक आहे. ते सध्याच्या धावपळीच्या युगात देखील ते स्वत:च्या आरोग्याची काळजा घेण्यात ते दोन पावले इतरांपेक्षा पुढेच असतात.
विशाल शिर्के
पुणे : चांगला पाऊस आणि वातावरणाचे वरदान लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील भूजल साठे आजाराला निमंत्रण देणाऱ्या फीकल कोलिफॉर्म सारख्या जीवाणूंनी बाधित असल्याची माहिती हाती आली आहे. राज्यात आढळलेल्या १ हजार ९६९ प्रदुषित नमुन्यांपैकी निम्मे जिल्ह्यातील आहेत.
केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने जाहीर केलेल्या राज्य जल गुणवत्ता अहवालातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा खूपच चांगली असल्याचे दिसत आहे. आर्सेनिक सारख्या विषारी घटकांचे प्रमाण राज्यात शून्य आहे. आयर्न, फ्लोराईड, नायट्रेट यांसारख्या घटकांचे प्रमाण देखील तुनलेने कमी आहे. मात्र, जनावरांचा मैलापाणी आणि अस्वच्छतेमुळे पसरणाºया कोलिफॉर्म सारख्या जीवाणूचे अस्तित्व राज्यातील काही जिल्ह्यांत दिसून येत आहे.
राज्यातील २ लाख ६५ हजार ९५६ भूजल साठ्यांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्या पैकी २ लाख ५८ हजार नमुन्यांमधे कोणतीही दुषके आढळली नाहीत. सुमारे पाच हजारांहून अधिक नमुन्यांमध्ये आयर्न, फ्लोराईड, नायट्रेट आणि मानवी आरोग्यास बाधक ठरणाऱ्या जीवाणूंची उपस्थिती आढळून आली. त्यातही नागपूरमध्ये आयर्न, परभणीमध्ये नायट्रेट आणि पुणे जिल्ह्यातील भूजलसाठ्यात जीवाणूंचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. पुण्यामधील भूजल साठ्यामध्ये नायट्रेट, क्षारता, फ्लोराईड यांसारखे घटक अजिबात उपस्थित नाहीत. त्यातही दुषित नमुन्यांपैकी तब्बल ७० टक्के फीकल कोलिफॉर्मचे नमुने एकट्या दौंड तालुक्यातील आहेत.
-
पाण्यातील सूक्ष्म जंतूंमुळे पसरणारे आजार
विषाणू, सूक्ष्म जंतू, आदिजीव (प्रोटोझेआ), एकपेशीय जीव आणि जंतूद्वारे अनेक रोग होतात. मानवी मलमूत्रामुळे दुषित झालेल्या पाण्यामुळे देखील अनेक रोगांना निमंत्रण मिळते. पटकी (कॉलरा), विषमज्वर (टायफाईड), कावीळ (हेपटायटीस), लेप्टोस्पायरसीस असे अजार होतात. या शिवाय पाण्यातून अथवा पाण्याची कमतरता झाल्याने हगवण, आमांश, जठरदाह देखील होऊ शकतो. ईकोलिफॉर्म जंतू पाण्यात नसावेत.
-
अशी होते पाण्याची जैविक तपासणी
पाण्यातील सूक्ष्म जंतूचे, कोलिफॉर्म व फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण तपासण्यासाठी एच. टू. एस. व्हायल ही पद्धत वापरली जाते. यामध्ये पाण्याचा नमुना एचटूएस व्हायलमध्ये घेऊन विशिष्ट खुणे पर्यंत भरला जातो. हा नमुना ३० ते ४८ तास ठेवतात. त्यानंतर नमुना काळा झाल्यास पाण्यात रोगकारक जंतू असल्याचे मानले जाते.