केटरिंगवाल्यांचा निष्काळजीपणा बेततोय जिवावर

By admin | Published: May 23, 2017 05:11 AM2017-05-23T05:11:27+5:302017-05-23T05:11:27+5:30

लग्न समारंभ अथवा अन्य कार्यक्रमांसाठी ५०० ते १००० लोकांचे जेवण तयार करण्याची आॅर्डर केटरिंगवाल्यांना दिली जाते. हे केटरिंगवाले जेवण तयार करताना

The caretaker's negligence | केटरिंगवाल्यांचा निष्काळजीपणा बेततोय जिवावर

केटरिंगवाल्यांचा निष्काळजीपणा बेततोय जिवावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : लग्न समारंभ अथवा अन्य कार्यक्रमांसाठी ५०० ते १००० लोकांचे जेवण तयार करण्याची आॅर्डर केटरिंगवाल्यांना दिली जाते. हे केटरिंगवाले जेवण तयार करताना, अन्नपदार्थ बनविताना स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाहीत. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार घडतात.
रहाटणी, काळेवाडीतील थोपटे लॉन्सवर रविवारी रात्री ७४ जणांना अन्नातून विषबाधा झाली. या घटनेने केटरिंग व्यावसायिकांच्या निष्काळजीपणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवावर बेतण्याची परिस्थिती ओढावू नये, यासाठी त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विवाह समारंभ, धार्मिक सोहळा वा अन्य कोणताही कार्यक्रम असो, त्या ठिकाणी एकाच वेळी पाचशे, हजार, दोन हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. अशातच विवाहाचे मुहूर्त उन्हाळ्यातच अधिक असतात. एप्रिल, मे महिन्यात तर एकाच वेळी अनेक ठिकाणी विवाह समारंभ असतात.
लग्नसराई हा पैसे कमाविण्याचा हंगाम असल्याने केटरिंगवाले सुद्धा मिळेल तेवढ्या आॅर्डर घेतात. एकाच वेळी दोन ते तीन ठिकाणी आॅर्डर घेतल्यानंतर नियोजन चुकते. एकमेकांकडील मनुष्यबळ वापरात आणले जाते. त्यांचे नियोजन चुकल्याने गोंधळ होतो.

रोजंदारीवर कोणीही होते वाढपी
केटरिंग व्यवसायातील काहीजण नोकरी सांभाळून हा व्यवसाय करतात. पूर्णपणे त्यांचे या व्यवसायात लक्ष नसते. लग्नसराईचा हंगाम येताच ते मनुष्यबळाची जुळवाजुळव करतात. स्वयंपाकासाठी मदतनीस म्हणून ऐनवेळी महिलांची शोधाशोध केली जाते. ज्यांचा केटरिंग व्यवसायाशी संबंध नाही, अशांना विवाह समारंभ अथवा अन्य कार्यक्रमात रोजंदारीवर वाढपी म्हणून बोलावले जाते. नखे वाढलेले, केस वाढलेले तरुण अथवा वयोवृद्ध व्यक्ती वाढपी म्हणून काम करताना दिसून येतात. दुग्धजन्य पदार्थांची विशेष दक्षता घ्यावी
उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थ तयार करायचे असतील, तर त्यांची विशेष दक्षता घ्यावी लागते. उन्हाच्या कडाक्यात बाहेर ठेवल्यास लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे फ्रिजमध्ये असे पदार्थ ठेवावे लागतात. आंब्याचा रस तयार करायचा असेल, तर चांगल्या प्रतीचे आंबे घ्यावे लागतात. केटरिंगवाले नफा कमाविण्यासाठी कसलेही आंबे खरेदी करतात अथवा पावडर वापरतात. त्यांच्या या कमीत कमी भांडवल गुंतवून जादा नफा कमाविण्याच्या वृतीमुळे अन्नपदार्थ खराब होण्याची अधिक शक्यता असते. रुग्णालयांवर ताण
समारंभातील जेवणात अन्नातून विषबाधा होण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांप्रसंगी एकाच वेळी अनेक लोकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागते. ऐनवेळी रात्री-अपरात्री मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. त्या वेळी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांना कमी मनुष्यबळ असताना, नियमित रुग्णसेवेबरोबर अतिरिक्त ताण सहन करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत तातडीक सेवा देण्याची त्यांची तयारी असते. परंतु अशा घटना घडू नयेत, याची दक्षता घेतली तर रुग्णालयांवर ताण येणार नाही. लग्न समारंभास आलेल्या पाहुण्यांना थंड पाणी अथवा सरबत वाटप करण्याची खास व्यवस्था केलेली असते. मात्र सरबत आणि पाणी थंड राहावे यासाठी केलेली व्यवस्था आरोग्याला धोका पोहोचविणारी असते, हे लक्षात येत नाही. बराच काळ पाणी अथवा सरबत थंड राहावे म्हणून पिंपात खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचे तुकडे टाकले जातात. औद्योगिक वापरासाठी तयार केलेला बर्फ सर्रासपणे लग्न समारंभात पाणी थंड ठेवण्यासाठी वापरला जातो. ऐन उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाई भेडसावते. लग्न समारंभावेळी पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी नाईलाजास्तव टँकर मागवावा लागतो. सातशे ते हजार रुपये मोजून मागविलेला टँकर समारंभस्थळी येतो. पाणी कोठून आणले, याच्या खोलात कोणी जात नाही. खासगी टँकरवाले विहिरीतील, बोअरचे पाणी घेऊन येतात. महापालिकेचा पाणीपुरवठा होत नसेल, तर त्यांच्याकडून येणारे पाणी हे शुद्ध असेल, याची खात्री नाही.

Web Title: The caretaker's negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.