शारजासह दुबई, सिंगापूर, बँकाकला पुण्यातून कार्गो वाहतूक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 11:59 AM2022-03-10T11:59:49+5:302022-03-10T12:02:02+5:30
अभिजीत कोळपे पुणे : लोहगाव विमानतळ विस्तारासाठी १३ एकर जागा संरक्षण विभागाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिली आहे. यामध्ये देशांतर्गत ...
अभिजीत कोळपे
पुणे : लोहगाव विमानतळ विस्तारासाठी १३ एकर जागा संरक्षण विभागाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिली आहे. यामध्ये देशांतर्गत ३५ मोठ्या शहरांबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील शारजासह दुबई, सिंगापूर, हाँगकाँग तसेच बँकाॅकबरोबर इतर देशातही मालवाहतुकीला चालना मिळू शकते. त्यासाठी महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्या कोणकोणत्या एअरलाईन्स सुरू करणार आहेत, यावर अवलंबून आहे. येत्या काही दिवसांत या १३ एकर जागेचे पूर्ण आराखड्याचे नियोजन हे नियोजन अधिकाऱ्यांच्या (प्लॅनिंग ऑफिसर) मार्फत तयार करण्यात येणार आहे, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (लोहगाव) संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय पातळीवर मालवाहतूक करण्यासाठी संरक्षण विभागाने लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी सोमवारी (दि. ७) रोजी १३ एकर जागा देण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. याविषयी बोलताना संतोष ढोके म्हणाले, की लोहगाव विमानतळावरून सध्या देशांतर्गत काही शहरांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त अरब अमिराती येथील फक्त शारजा येथे मालवाहतूक (कार्गो) सुरू आहे. १३ एकर जागा ताब्यात आल्यानंतर आणि त्याचे पूर्ण विकसन झाल्यानंतर भविष्यात कार्गो वाहतूक सुरू होईल. मात्र, यासाठी विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांवर अवलंबून असणार आहे. या विमान कंपन्यांना आपण सर्वोत्तम सुविधा आणि जागा उपलब्ध करून देणार आहोत.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना होणार फायदा
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, चिकू, संत्र, आंबा, स्ट्रॉबेरी, अंजीर, सीताफळ, केळी यांसह फुलांमध्ये गुलाब, कार्नेशन, जिप्सी, ग्लाॅडिओ, गुलछडी आदींसह इतरही मालाची आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील पाच शहरांसह इतर देशातही भविष्यात निर्यात वाढवता येईल.
दोन टर्मिनलमधील नागरिकांचा त्रास होणार कमी
लोहगाव विमानतळावरील दोन टर्मिनलच्या मध्ये सध्या कार्गो वाहतुकीसाठी थोडी जागा होती. मात्र, त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना अडचण निर्माण होत होती. आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाला लागून सरंक्षण विभागाची स्वतंत्र जागा मिळत आहे. त्यामुळे दोन टर्मिनलमधून प्रवास करताना नागरिकांना होणारा त्रास बंद होणार आहे.
- संतोष ढोके, संचालक, भारतीय विमानतळ प्राधिकरण (लोहगाव)