पोर्टलवर नोंदणी नसल्यास काेरोना लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:06 AM2021-01-01T04:06:36+5:302021-01-01T04:06:36+5:30
बारामती तालुका टास्क फोर्स समितीची बैठक नुकतीच टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ...
बारामती तालुका टास्क फोर्स समितीची बैठक नुकतीच टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी टास्क फोर्स समितीचे सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. सदानंद काळे, गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, मिथुनकुमार नागमवाड, आरोग्य विस्तार अधिकारी सुनील जगताप आदी उपस्थित होते.
दादासाहेब कांबळे म्हणाले, कोरोना लसीकरणासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सर्व शासकीय आरोग्य कर्मचारी, खासगी वैद्यकीय व्यवसायिक, सफाई कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्याकरीता या सर्वांनी पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगून ज्यांची नोंदणी राहिली असेल त्यांनी तात्काळ ३० डिसेंबर पर्यंत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती बारामती यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कांबळे यांनी केले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खोमणे म्हणाले की, तालुक्यातील शासकीय आरोग्य कमचारी यांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली आहे. परंतु काही खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, कर्मचारी यांची नोंदणी पोर्टलवर झालेली नाही. पोर्टलवर नोंदणी असल्याशिवाय लस दिली जाणार नाही.