अनियमित हवामानामुळे कांदापिकावर करपा
By Admin | Published: January 22, 2016 01:33 AM2016-01-22T01:33:36+5:302016-01-22T01:33:36+5:30
परिसरात सध्या कांद्याच्या पिकावर हवामानात होणाऱ्या अनियमित बदलांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे
राजेगाव : राजेगाव (ता. दौंड) परिसरात सध्या कांद्याच्या पिकावर हवामानात होणाऱ्या अनियमित बदलांमुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. मोठ्या पैशाच्या अपेक्षेने केलेल्या कांदापिकाचे वांदे होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
सध्या काही प्रमाणात थंडी वाढू लागली आहे. थंडीमुळे दव किंवा धुके यांच्या प्रमाणात वाढ होत असून, कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे कांद्याच्या पातीवर (पानांवर) पांढरे चट्टे पडू लागले आहेत. दिवाळीदरम्यान लागवड झालेले कांदापीक सध्या काढणीला आलेले आहे. ज्याची काढणी १0 ते १५ दिवसांत होणार आहे त्या कांदापिकावर दव किंवा धुक्याचा फारसा परिणाम होणार नाही. परंतु ज्या कांदापिकाच्या काढणीला एक ते दीड महिना किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी असेल, त्यांनी दव किंवा धुक्यापासून पिकाचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे मत जाणकार शेतकरी व्यक्त करीत आहेत. याबाबत राजेगाव येथील कृषी सहायक शरद काळे म्हणाले की, धुके किंवा दव अशी स्थिती असल्यास कांदापिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करण्यात सध्या शेतकरी व्यस्त आहे. धुके किंवा थंडीपासून कांदापिकाला वाचवण्यासाठी ज्यांच्याकडे तुषार सिंचन उपलब्ध आहे, त्या शेतकऱ्यांनी सकाळी पाच ते दहा मिनिटे यंत्रणा चालवावी. दव धुऊन गेल्याने नुकसानीचे प्रमाण कमी होते. ज्यांच्याकडे तुषार सिंचन यंत्रणा नाही त्यांनी फवारणी पंपाने फवारणी करून घ्यावी.