अतिवृष्टीत पूल गेला वाहून; जावळेवाडीचा संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:20+5:302021-07-24T04:08:20+5:30
लोकमत न्यूज नेट डेहणे : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरात मंदोशी-जावळेवाडी (ता. खेड) या दोन गावांना जोडणारा रस्ता आणि मोरी वाहून ...
लोकमत न्यूज नेट
डेहणे : अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरात मंदोशी-जावळेवाडी (ता. खेड) या दोन गावांना जोडणारा रस्ता आणि मोरी वाहून गेल्याने जावळेवाडीचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी व अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली असून पंचानामे करण्याचे आदेश देऊन तातडीने पुल दुरूस्त करण्याचे आदेश दिले आहे.
खेडच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या भात खाचरांचे अतोनात नुकसान झाले आहे. काहींच्या घरात पाणी शिरले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी थेट घटनास्थळी जात ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना नुकसानीची सविस्तर माहिती दिली. याबाबत तालुकास्तरावर संबंधीत अधिकाऱ्यांनी तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी निर्मला पानसरे यांनी दिली.याप्रसंगी माजी सभापती अरुण चांभारे, पश्चिम विभाग अध्यक्षा सुजाता पचपिडं, सरपंच दत्ता खाडे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक लक्ष्मण तिटकारे, किरण वांळुज, बांधकाम विभागाचे अधिकारी एल. बी जोशी, सार्वजनिक बांधकाम अभियंता मधुकर भिंगारदेवे, ग्रामसेवक लेडें आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : मंदोशी - जावळेवाडी (ता. खेड) येथे वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे.