वाहकाने विद्यार्थिनींना लावले पाय धरायला, पालक झाले संतप्त
By admin | Published: October 19, 2015 08:13 PM2015-10-19T20:13:56+5:302015-10-19T20:15:44+5:30
चुकीच्या मार्गावरील बसमध्ये चढलेल्या विद्यार्थिनींना पीएमपीच्या वाहकाने चक्क पाया धरून माफी मागण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १९ - चुकीच्या मार्गावरील बसमध्ये चढलेल्या विद्यार्थिनींना पीएमपीच्या वाहकाने चक्क पाया धरून माफी मागण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे. कात्रज-पद्मावती भागात राहणाऱ्या सहा ते सात विद्यार्थिनी पुलगेट येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी येतात. त्यातील काही सातवीच्या, तर काही आठवीत शिकत आहेत. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्या घरी जाण्यासाठी त्या पीएमपी बस थांब्यावर आल्या. गोळीबार मैदान येथील थांब्यावरून त्या कोथरूडला जाणाऱ्या पीएमपीमध्ये चढल्या. वाहकाने त्यांना पास मागितला. तेव्हा त्यांना चुकीच्या बसमध्ये बसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बस थांबविण्याची विनंती केली. मात्र, पास चालत नसल्याने तिकीटच काढावे लागेल, नाहीतर कोथरूड येथे घेऊन जाईन... असे वाहकाने दरडावून सांगितले व बस थांबविली नाही. तिकिटासाठी पैसे नसल्यामुळे विद्यार्थिंनी चांगल्याच भेदरल्या होत्या. अखेर तिघीजणी स्वारगेट येथील बसथांब्यावर उतरल्या, तर बाकीच्यांना नेहरू स्टेडियमच्या बस थांब्यावर वाहकाने उतरवले; परंतु उतरण्यापूर्वी त्याने या विद्यार्थिनींना पाय पडून माफी मागण्यास भाग पाडले. स्वारगेटहून पुढच्या बसथांब्यावर नेऊन सोडल्यामुळे या विद्यार्थिनी अधिकच घाबरल्या.
विद्यार्थिनींकडून ही घटना समजल्यानंतर पालक व संतप्त नागरिकांनी कोथरूड डेपोत डेपो सुपरवायझर रज्जाक शिकलकर यांना घेराव घातला. शिकलकर यांनी या विद्यार्थिनींकडून घटनेची माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या वर्णनावरून वाहक व चालकांची माहिती मागविली. संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले.
बसचा क्रमांक किंवा मार्ग क्रमांक दिल्यास दोषी वाहकाला शोधून काढून त्याच्यावर कारवाई करता येईल, अशी माहिती पीएमपीचे कोथरूड आगारातील अधिकारी चंद्रकात वर्पे यांनी दिली.