आता करा गाजर हलव्याचा बेत ; राजस्थानातील गाजरांचा हंगाम जोमात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:33 PM2018-12-23T18:33:52+5:302018-12-23T18:35:12+5:30
गाजर हलव्यासाठी आवश्यक असलेल्या राजस्थानातील गोड गाजरांचा हंगाम मार्केट यार्डांत सुरु झाला असून, आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पुणे : लहानांनपासून मोठ्या पर्यंत प्रत्येकालाच गाजर हलवा प्रचंड आवडतो. याच गाजर हलव्यासाठी आवश्यक असलेल्या राजस्थानातील गोड गाजरांचा हंगाम मार्केट यार्डांत सुरु झाला असून, आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे गाजराचे दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. मिठाई व्यावसायिक व गृहिणींकडून या हंगामात गाजरांना चांगलीच मागणी असते.
दरवर्षी साधारण नोंव्हेबर, डिसेंबरमध्ये राजस्थानातील गाजरांची आवक येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये सुरु होते. राजस्थानातील लालचुटूक, पाणीदार गाजर गोडीला देखील चांगले असतात. यामुळे हलव्यासाठी या राजस्थानी गाजरांना मागणी अधिक असते. मार्केटयार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.२३) रोजी सुमारे १० ते १२ ट्रक राजस्थानी गाजरांची आवक झाली. घाऊक बाजारात दहा किलो गाजरांना ११० ते ८० रुपये असा दर मिळत आहे. मागणी चांगली असली तरी आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने किरकोळ बाजारात ११ ते ८ रुपये किलो पर्यंत दर खाली आले आहे. सध्या बाजारात आलेल्या गाजरांची प्रतवारी देखील चांगली आहे. थंडी सुरु झाली की राजस्थानी गाजरांची आवक सुरु होते. नोंव्हेबर महिन्यात सुरु होणा-या राजस्थानी गाजरांचा हंगाम मार्च- एप्रिल महिन्यापर्यंत सरु राहतो, अशी माहिती गाजराचे व्यापारी बापू वाडकर यांनी दिली.
गावरान गाजरांची संक्रातीच्या मुहूर्तावर आवक
गावरान गाजरांचे उत्पादन गेल्या काही वर्षांत खूपच कमी झाले असून, केवळ संक्रातीच्या मुहूर्तावर सातार, पुणे जिल्ह्याच्या काही भागातून या गावरान गाजरांची आवक होते. याशिवाय रंगाने पिवळसर व थोडी तुरट असलेल्या गाजरे महाराष्ट्र व मध्ये प्रदेश येथून पुण्याच्या बाजारात विक्रीसाठी येतात. ही गाजरे वर्षभर कमी जास्त प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. परंतु राजस्थान येथील गाजरांचा हंगाम थंडीमध्येच चार ते पाच महिन्यांसाठीच असतो. राजस्थानी गाजर गोड असल्याने हलव्यासाठी मोठी मागणी असते. मार्केट याडार्तून गोवा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव येथे गाजरे विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे गाजराचे व्यापारी बापू वाडकर यांनी सांगितले.