डोंगरावरील माती जातेय वाहून; भविष्यात शहराला धोका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:12+5:302021-07-28T04:10:12+5:30
पुणे : भैरोबानाला पावसाळ्यात भरून वाहतो. दरवर्षी त्यात पावसाचे गढूळ पाणी येत असते. पण यंदा मात्र या नाल्यात लालसर ...
पुणे : भैरोबानाला पावसाळ्यात भरून वाहतो. दरवर्षी त्यात पावसाचे गढूळ पाणी येत असते. पण यंदा मात्र या नाल्यात लालसर किंवा तांबडे पाणी येत आहे. डोंगरातील माती वाहून जात असल्याने पाणी लाल दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुण्याभोवती चांदणी चौक, कात्रज परिसरातील डोंगर तोडले जात असल्याने पावसात तेथील लाल माती वाहून जात आहे. परिणामी हे डोंगर ठिसूळ होणार आहेत. त्यामुळे भविष्यात पुण्यालाही पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या कोल्हापूर, चिपळूण, सांगलीमध्ये पुरामुळे लोकांचे हाल होत आहेत. त्या ठिकाणी देखील सर्वत्र लाल मातीमिश्रित पाणीच दिसून येत आहे. याचाच अर्थ डोंगरावरील माती पावसाच्या पाण्याने वाहत आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे बांधकामे, रस्त्यासाठी डोंगर फोडणे, प्लॉटिंगसाठी डोंगरांचा वापर आदी कारणांमुळे डोंगरावरील वृक्षदेखील कापली जात आहेत. झाडांची मुळे हाताच्या पंजाने पकडल्यासारखी जमीन घट्ट धरून ठेवतात. खोलवर जाणारी आणि पसरणारी मुळे असलेली झाडे पर्वतांच्या उतारावर लागतात. या उतारांवर अशा झाडांखेरीज इतर कोणतीही वनश्री माती धरून ठेवू शकत नाही. झाडे जवळ जवळ पाहिजेत. त्यामुळे जमिनीत त्यांची मुळे एकमेकांत गुंतली जातात. त्यांची जाळी बनते. काही झाडांची मुळे सरळ सोट खोलवर जाणारी, तर काहींची वरवर, पण व्यापक प्रमाणावर पसरणारी मुळे असावी लागतात. या रचनेमुळे माती घट्ट धरून ठेवली जाते. झाडांचे शेंडे एकमेकांवर येणारे आणि आच्छादन घालणारे असावेत. त्यामुळे सोसाट्याने येणारा पाऊस या शेंड्यांवर अडविला जाऊन, त्याचा वेग कमी होऊन पाणी हलकेच जमिनीवर पडते. साहजिकच माती जागच्या जागी घट्ट आणि पक्की राहते. जमिनीच्या संरक्षणाबरोबरच झाडांचे चांगले आच्छादन जमिनीखालचे पाणी वाढविण्यास मदत होते. पाणी जर डोंगरावरून वाहून गेले तर जमिनीखाली साठणार नाही. जमिनीवरचा पालापाचोळा प्रवाहाला विरोध करतो. ते जमिनीत जिरते.
—————————————
स्वच्छ पाणी असेल तर सर्व छान
डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यांमधले पाणी गढूळ असते. याचाच अर्थ तेथील माती वाहून जातेय. ते पाणी जर स्वच्छ असेल तरच तेथील माती घट्ट चिकटून बसलेली आहे आणि एकूण परिस्थिती चांगली आहे असे समजते. पण पाणी गढूळ असेल तर वरवरचे हिरवे आच्छादन काहीच उपयोगाचे नसते.
——————————————-
डोंगरफोड केल्याने तेथील लाल माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून नदी, नाल्यात जाते. परिणामी त्यातील पाणी लालसर दिसून येते. डोंगरफोड करणे अतिशय धोकादायक आहे.
- डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ
————————————-