मोटारीची काच फोडून पाच लाख केले लंपास
By admin | Published: May 10, 2016 12:51 AM2016-05-10T00:51:15+5:302016-05-10T00:51:15+5:30
कांदा व्यापाऱ्याच्या कारच्या खिडकीची काच फोडून आतील ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड ठेवलेली लेदरची बॅग पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी (दि. ९) दुपारी ३च्या सुमारास
इंदापूर : कांदा व्यापाऱ्याच्या कारच्या खिडकीची काच फोडून आतील ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड ठेवलेली लेदरची बॅग पळवून नेल्याचा प्रकार सोमवारी (दि. ९) दुपारी ३च्या सुमारास, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत, इंदापूर-अकलूज रस्त्यावर घडला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष व कांद्याचे व्यापारी नीलेश श्यामराव देवकर (रा. कळाशी, ता. इंदापूर) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कांद्याचे पैसे देण्यासाठी नीलेश देवकर यांनी इंदापूर येथील स्टेट बँक आॅफ इंडियामधील आपल्या खात्यातून पाच लाख रुपयांची रक्कम काढली. ती रक्कम बॅगमध्ये ठेवली. आपल्या मोटारीमधील चालका शेजारच्या सीटखाली ती बॅग ठेवली.
मोटारीने कळाशीला जाण्यासाठी शहरातील बाबा चौकाकडे गाडी वळवत असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवरून येणाऱ्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील दोघांनी हातवारे व खुणा करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. खिडकीची काच खाली करून देवकर यांनी ते काय म्हणतात ते ऐकले. त्या दोघांनी कारच्या इंजिनमधून आॅईल गळत असल्याचे देवकर यांना सांगितले. देवकर यांनी कारमधून उतरून पाहणी केली. कार सुरू करून ते काही अंतर पुढे गेले. इंदापूर-अकलूज या शंभर फुटी रस्त्याला आल्यानंतर खासगी कामासाठी त्यांनी तेथे कार लॉक केली. बॅगमधील दहा हजार रुपये घेऊन ते विनय व्हील अलॉयमेंट या ठिकाणी गेले. तेथे ते दहा मिनिटे थांबले. तेथून कारकडे येत असताना, समोरून येणाऱ्या एका इसमाने कार कुणाची आहे. तिच्या खिडकीची काच कशी फुटली, असे म्हटल्यामुळे देवकर यांनी तातडीने तेथे जाऊन पाहिले. ज्या सीटखाली बॅग ठेवली होती, तेथील खिडकीची काच फोडून आतील बॅग कोणीतरी पळवून नेल्याचे त्यांना लक्षात आले. या बॅगमध्ये बँकेची चेकबुके, एटीएम कार्ड होते.
यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार ए. एम. काझी तपास करत आहेत. (वार्ताहर)