व्यंगचित्रकलेचा अभ्यासक्रमच नाही, व्यंगचित्रकारांची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:19 AM2018-05-05T04:19:30+5:302018-05-05T04:19:30+5:30
कला मानवाचे जीवन समृध्द करते, अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. तरुणांमधील कलेला योग्य दिशा मिळावी, याचे शिक्षण देणारी अनेक कलामहाविद्यालये बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आहेत. मात्र, व्यंगचित्रकलेचे शिक्षण देणारे महाविद्यालय कोठेही उपलब्ध नाही. बरेचदा याबाबत चर्चा, मागणी तसेच प्रस्ताव दाखल झाले आहेत.
पुणे - कला मानवाचे जीवन समृध्द करते, अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. तरुणांमधील कलेला योग्य दिशा मिळावी, याचे शिक्षण देणारी अनेक कलामहाविद्यालये बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आहेत. मात्र, व्यंगचित्रकलेचे शिक्षण देणारे महाविद्यालय कोठेही उपलब्ध नाही. बरेचदा याबाबत चर्चा, मागणी तसेच प्रस्ताव दाखल झाले आहेत. मात्र, या प्रस्तावांना ठोस स्वरुप न मिळाल्याने व्यंगचित्रकलेचा अभ्यासक्रमच अस्तित्वात नाही, अशी खंत जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त व्यंगचित्रकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
विनोदबुध्दी, आजूबाजूच्या परिस्थितीचे आणि घटनांचे बारकाईने निरिक्षण करण्याची क्षमता आणि चित्र काढण्याची कला अवगत असेल तर व्यंगचित्रकलेच्या क्षेत्रात निश्चितपणे यशस्वी होता येते. आजकाल शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागातील तरुणही व्यंगचित्रकलेमध्ये करिअर करत आहेत. मात्र, शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील तरुणांना पुरेसा वाव मिळत नाही. चित्रकला हा व्यंगचित्रकलेचा पाया असतो. पूर्वीच्या व्यंगचित्रकारांचे काम पाहून आम्ही घडलो. मात्र, बदलत्या काळात व्यंगचित्रकलेचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल आणि नवीन आयाम मिळवून द्यायचे असतील तर कला महाविद्यालयांमध्ये व्यंगचित्रकलेचा अभ्यासक्रम अंतर्भूत व्हावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
व्यंगचित्रकार घनश्याम देशमुख म्हणाले, ‘शालेय वयापासून मुलांवर व्यंगचित्रकलेचे संस्कार व्हायला हवेत. त्यांच्यामध्ये समज उत्पन्न व्हावी. महाराष्ट्रातील कला महाविद्यालयांमध्ये व्यंगचित्रकलेचा इतिहास, वस्तूस्थिती, विचार, मांडणी यांचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमांची मांडणी होणे गरजेचे आहे. शिक्षण घेत असतानाच मुलभूत ज्ञान मिळाल्यास, जाणकार व्यंगचित्रकारांचे मार्गदर्शन लाभल्यास भविष्यात दर्जेदार व्यंगचित्रकारांची फळी तयार होऊ शकते.’
चित्रातून संवाद साधता आला पाहिजे
व्यंगचित्रकला आत्मसात करण्यासाठी विनोदबुध्दी, निरिक्षण क्षमता आणि चित्रकलेची समज हे तीन निकष अत्यावश्यक असतात. या क्षमता आत्मसात करण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार होणे आवश्यक आहे. व्यंगचित्रकाराला राज्यशास्त्र, इतिहास अशा विषयांचे सखोल ज्ञान असायला हवे. चित्रातून संवाद साधण्याचे कौशल्यही आत्मसात करणे गरजेचे असते. व्यंगचित्रकलेच्या अभ्यासक्रमात देशाप्रमाणेच देशाबाहेरील व्यंगचित्रांचे नमुने अभ्यासले गेले पाहिजेत. व्यंगचित्रकलेच्या अभ्यासक्रमाबाबत काही महाविद्यालयांनी प्रारंभीची पावले उचलली, चर्चा झाल्या. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे माहित नाही.’ स्वतंत्र कलामहाविदयालये याबाबत धाडसी पावले उचलू शकतात. नव्या महाविद्यालयांमध्ये बदल घडून येऊ शकतात. त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातही व्यंगचित्रकलेचा समावेश व्हायला हवा.
- शि.द.फडणीस, ज्येष्ठ व्यंगचित्रकार