व्यंगचित्रकार देशद्रोही कसे?

By Admin | Published: December 23, 2016 01:00 AM2016-12-23T01:00:25+5:302016-12-23T01:00:25+5:30

‘देशाची व्यवस्था बिघडविणारे ते देशभक्त आणि त्या बिघडलेल्या व्यवस्थेवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार मात्र देशद्रोही कसे?’

Cartoonist is a traitor? | व्यंगचित्रकार देशद्रोही कसे?

व्यंगचित्रकार देशद्रोही कसे?

googlenewsNext

पुणे : ‘देशाची व्यवस्था बिघडविणारे ते देशभक्त आणि त्या बिघडलेल्या व्यवस्थेवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार मात्र देशद्रोही कसे?’ असा सवाल ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी उपस्थित केला.
साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजन‘कार’ का. र. मित्र व्याख्यानमालेत ‘व्यंगचित्रे आणि विनोद’ या विषयावर ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व्यासपीठावर होते.
तेंडुलकर म्हणाले, ‘‘इतर सर्व कला उस्फूर्त आहेत. व्यंगचित्र मात्र प्रतिक्रियेतून जन्माला येते. लेखकाला टोपणनाव घेऊन लेखनाच्या मागे लपता येते, तसे व्यंगचित्रकाराला त्याच्या व्यंगचित्रामागे लपता येत नाही. व्यंगचित्र हीच त्याची ओळख बनते. व्यंगचित्रे आणि त्यांतील आशय समजण्याएवढी प्रगल्भता सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या समाजाकडे आजही नाही. त्यामुळेच व्यंगचित्रांमुळे वादळे निर्माण होतात. कधी सरकारची, कधी धर्माची तर कधी जातीची बंधने व्यंगचित्रकारांवर येत आहेत ही चिंतेची बाब आहे. कलाकाराला कोणत्याही कप्प्यात बंदिस्त करणे योग्य नाही.’’
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘सूक्ष्म निरीक्षणशक्तीबरोबरच तरल संवेदनशीलता आणि विनोदबुद्धी व्यंगचित्रकाराकडे असावी लागते. चित्रकाराबरोबरच विनोदकाराचे कसबही व्यंगचित्रकाराकडे असावे लागते. जीवनातील विकृती आणि विसंगतीकडे दयाबुद्धीने पाहण्याची दृष्टी असावी लागते. रंजनाबरोबरच डोळ्यांत अंजन घालण्याचे काम व्यंगचित्रकार करीत असतात.’’
दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Cartoonist is a traitor?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.