रस्त्यांचे खोदकाम; वाहतुकीचे तीनतेरा
By admin | Published: March 4, 2016 12:52 AM2016-03-04T00:52:18+5:302016-03-04T00:52:18+5:30
समोरचा रस्ता खोदलेला, डाव्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू, उजव्या बाजूच्या रस्त्यावर डांबरीकरण चाललेले, परंतु मागे वळावे तर एकेरी वाहतुकीचा नियम तोडल्याची भीती, करावे तर काय करावे
पुणे : समोरचा रस्ता खोदलेला, डाव्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू, उजव्या बाजूच्या रस्त्यावर डांबरीकरण चाललेले, परंतु मागे वळावे तर एकेरी वाहतुकीचा नियम तोडल्याची भीती, करावे तर काय करावे, पुणेकर नागरिकांसमोर असा गहण प्रश्न सध्या महापालिकेने निर्माण केला आहे. या सर्व खात्यांमध्ये आॅनपेपर चांगला समन्वय आहे, प्रत्यक्षात मात्र त्यांनीच सर्वांनी मिळून शहरातील बहुतेक रस्त्यांचे बारा वाजवले आहेत.
मार्च अखेरमुळे पालिकेतील सर्वच माननीयांना आपापल्या मतदारांची एकदम काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे एकाच वेळी गल्ली, बोळ, मोठ्या रस्त्यांना जोडणारे लहान रस्ते यांची कामे सुरू झाली आहेत. रस्ता खोदायचा व अनेक दिवस तसाच ठेवायचा, अशी पद्धत सुरू आहे. कामगार, रस्तेखोदाई करणारी यंत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची, पहिले काम तसेच सोडून द्यायचे, कामगार मिळाले की, ते सुरू करायचे, तोपर्यंत दुसऱ्या रस्त्याची खोदाई सुरू करायची, असा प्रकार शहरात अनेक ठिकाणी सुरू आहे.
आॅनपेपर एकदम आदर्श असणाऱ्या या रचनेचे तीनही यंत्रणांनी मिळून कसे बारा वाजवले आहेत, ते शहरात सर्वत्र रोज दिसत आहे. समन्वय नाही, नियोजन नाही अशा पद्धतीने सुरू असलेल्या या रस्ते खोदाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचालकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. शिवाय, त्या त्या परिसरातील नागरिकही कामाला होत असणाऱ्या विलंबामुळे वैतागले आहेत. काँक्रिटीकरण असेल तर रस्ता बराच खोल खोदला जातो, त्यावरून वाहन चालवताच येत नाही, डांबरीकरण असेल, तर रस्त्याच्या वरचा लेअर खरवडून काढला जातो, त्यावरून चालवले की वाहन एक तर घसरते किंवा टायर पंक्चर तरी होते. नागरिकांची मागणी नसतानाही माननियांच्या आग्रहातून ही कामे सुरू आहेत. (प्रतिनिधी)
रस्ता खोदायचा असेल, तर त्याआधी पालिकेने वाहतूक शाखेची परवानगी घ्यावी, असा नियम आहे. ठेकेदारालाही वाहतूक शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहतुकीला अडथळा होणार नाही, रस्ताखोदाई सुरू असताना, तिथे वाहतूक नियोजनासाठी दोन कामगार ठेवायचे, खोदलेल्या रस्त्याच्या बाजूने कापडी सुरक्षा चौकटी लावाव्यात, दिलेल्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण करावे, वाहतूक जास्त असेल तर काम रात्री करावे, असे अनेक नियम वाहतूक शाखेच्या ना हरकत प्रमाणपत्रात आहेत. त्याचे पालन करेन, असे लिहून दिल्यानंतरच ठेकेदाराला विशिष्ट मुदतीचे ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.
वाहतूक शाखा अशा कामांना ना हरकत प्रमाणपत्र देते. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होत नाही, हे खरे आहे. त्यामुळे आम्ही आता वाहतुकीला अडथळा आणला म्हणून ठेकेदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
- सारंग आव्हाड,
उपायुक्त, वाहतूक शाखा
रस्ता खोदण्यापूर्वी आम्ही त्याची कल्पना वाहतूक शाखेला देत असतो. सध्या एकाच वेळी अनेक कामे सुरू आहेत, त्यामुळे अडचण होत असेल. ठेकेदारांना सांगून त्यात नियोजन आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- राजेंद्र राऊत,
उपायुक्त, पथ विभाग, महापालिका