बीआरटीत अपघात झाल्यास ‘नो क्लेम’, बीआरटी मार्गामध्ये लावला फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 03:26 AM2018-04-06T03:26:07+5:302018-04-06T03:26:07+5:30
सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरीदेखील बिनदिक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत. बीआरटी प्रशासनाने या मार्गावर जागोजागी वॉर्डन नियुक्त केले असताना त्यांना न जुमानता खासगी वाहनचालक या मार्गाचा वापर करीत आहेत.
हडपसर - सोलापूर रस्त्यावर सर्वाधिक अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. मात्र तरीदेखील बिनदिक्तपणे या मार्गाने खासगी वाहने धावत आहेत. बीआरटी प्रशासनाने या मार्गावर जागोजागी वॉर्डन नियुक्त केले असताना त्यांना न जुमानता खासगी वाहनचालक या मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे या मार्गात अपघात झाल्यास संबंधितांना विमा कंपनीकडून क्लेम मिळणार नसल्याचे स्पष्टीकरण पीएमपी प्रशासनाने दिले आहे. तशा प्रकारचा फलक बीआरटी मार्गावर लावण्यात आला आहे.
खासगी वाहनांच्या घुसखोरीमुळे बीरआटी मार्गात वाहतूककोंडी व अपघात होत आहेत. त्यावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी बीआरटी मार्गात वाहनांचा अपघात झाल्यास विम्यासाठी क्लेम करता येणार नाही, असा फलक प्रशासनाच्या वतीने लावण्यात आला आहे. तरीदेखील अनेक खासगी वाहने या मार्गातून धावतात.
खासगी वाहनांसाठी असलेली लेन कमी पडत असल्यामुळे नागरिक बीआरटी मार्गातून जातात. नाईलाजास्तव वाहनचालक वाहने बीआरटी मार्गातून घालतात. त्यामुळे प्रशासनाने खासगी वाहनांसाठी असलेली लेनची रुंदी वाढवावी. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. सदोष बीआरटीची अंमलबजावणी होत असल्यानेच या मार्गावर अपघात वाढले आहेत, असे नागरिक संतोष जगताप यांनी
सांगितले.
बीआरटी मार्गात
घुसखोरी नको
सोलापूर रस्ता रुंदीने मोठा असला तरी अनेक वाहनचालक घाई करून बीआरटी मार्गातून वाहने घालतात. या मार्गात अनेकदा अपघात झाले आहेत. कारण हा मार्ग छोटा असून, त्यातून केवळ पीएमपी बस जाऊ शकते. परंतु, वाहनचालकाचे थोडं जरी दुर्लक्ष झालं तर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो या मार्गातून खासगी वाहनचालकांनी जाऊ नये, यासाठी बीआरटी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते. तसेच ठिकठिकाणी वॉर्डनही उभे करण्यात आले होते. तरीदेखील वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात.
बीआरटीत अपघात होऊन वाहनांचे नुकसान झाल्यास विम्याचा क्लेम मिळत नाही. लाईफ इन्शुरन्सचा क्लेम मिळणे अथवा नाकारणे हे प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीनुसार ठरते. तसेच पीएमपी बसकरिता हा रस्ता राखीव असल्याने पीएमपीएलवर वाहनचालकांना क्लेम करता येत नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनचालकांनी बीआरटी मागार्तून वाहने चालवू नयेत.
- प्रमोद तोरडमल, विमा प्रतिनिधी