तुमच्यावर उपचार करणारा डॉक्टर बोगस तर नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:47 PM2022-11-14T13:47:19+5:302022-11-14T13:49:04+5:30
बोगस डॉक्टर आढळल्यास कळविण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे...
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात दोन वर्षांत एकही बोगस डॉक्टर आढळून आलेला नाही. तर पुण्यात दहा महिन्यांत एक बोगस डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या तीन वर्षांत पुण्यात १२ बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई झाली. त्यापैकी सर्वाधिक ९ डॉक्टरांवर २०२१ मध्ये गुन्हे दाखल केले आहेत. उपचार करणारा डॉक्टर बोगस तर नाही ना, याची चौकशी करायला हवी. बोगस डॉक्टर आढळल्यास कळविण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आहे.
१० महिन्यांत एकावर तक्रार
पुण्यात दहा महिन्यांत १ बोगस डॉक्टराविरुद्ध महापालिकेकडे तक्रार आली. याप्रकरणी त्या महिला बोगस डॉक्टरवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात जुलै महिन्यात गुन्हा दाखल केला आहे. रुग्ण आणि नातेवाइकांनी सजग असायला हवे. पिंपरी-चिंचवडमधील सांगवी आणि वाल्हेकरवाडी परिसरात चार वर्षांपूर्वी बोगस डॉक्टरांविरोधात तक्रार झाली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
४७ डॉक्टरांची नोंद
महापालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे गेल्या ९ वर्षांत म्हणजे सन २०१३ पासून ४७ बोगस डॉक्टरांची नोंद केली आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल केलेले आहेत.
तक्रार कोठे कराल?
बोगस डॉक्टरांबाबतची तक्रार ही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे करता येते. आरोग्यप्रमुखांच्या नावे निनावी पत्र पाठवूनही करता येते. नागरिकांनी तोंडी तसेच लेखी तक्रार करावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. बोगस डॉक्टरांवरील कारवाईसाठी पथक असते.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात तीन वर्षांत बोगस डॉक्टराविषयी तक्रार आलेली नाही. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांच्या काही तक्रारी असेल किंवा बोगस डॉक्टराविषयी माहिती मिळाल्यास महापालिकेत तक्रार करता येईल. तसेच विविध ठिकाणच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याबाबतची अधिक माहिती घेण्यात येते. तक्रार आल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात येईल.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी