Pune: माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बारा जणांविरुद्ध घर बळकावल्याप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:05 PM2024-04-25T12:05:09+5:302024-04-25T12:07:38+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : घर बळकावल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि वानवडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे यांच्यासह १० जणांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, पोलिस निरीक्षक धनंजय पिंगळे, अरुण भुजबळ (रा. फातिमानगर, वानवडी), विद्या अरुण भुजबळ, प्रशांत पवार, उमेश भुजबळ, सदानंद तेलगू, कांताबाई बंडोबंत लांडगे, राजेंद्र बापूराव सुर्वे, तुकाराम किसन आगरकर, सपना घोरपडे आणि मनीषा गायकवाड यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे, तसेच न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून घराचा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे वानवडी परिसरात घर आहे. घराच्या मालकीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून १० एप्रिल २०२४ रोजी शिवरकर, पिंगळे यांच्यासह अन्य आरोपींनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आरोपींनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केला. याप्रकरणी महिलेने न्यायालयात तक्रार देऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.