संभाजी भिडे आणि मिलींद एकबाेटे यांच्यावरील गुन्ह्याचा तपास शेवटच्या टप्प्यात ; पाेलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 07:02 PM2019-12-30T19:02:28+5:302019-12-30T19:04:14+5:30
Bhima-Koregaon : काेरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचा तपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
पुणे : काेरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 साली झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे आणि समस्त हिंदु आघाडीचे प्रमुख मिलींद एकबाेटे यांच्यावर पुणे ग्रामीण पाेलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणी एकबाेटे यांना अटक देखील झाली हाेती. या गुन्ह्याचा तपास आता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती गुणे ग्रामीण पाेलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रविवारी काेरेगाव भीमा येथील प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये ते बाेलत हाेते. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम हे देखील उपस्थित हाेते. पाटील म्हणाले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबाेटे यांच्यावर दाखल गुन्हाची चार्जशिट सरकारची मंजुरी आल्यानंतर दाखल करण्यात येणार आहे. काेरेगाव हिंसाचाराप्रकरणी एकूण 30 गुन्हे गुणे ग्रामीण पाेलिसांकडे दाखल झाले हाेते. त्यातील 14 गुन्ह्यांची चार्जशिट दाखल करण्यात आली आहे तर 16 गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु आहे. भिडे आणि एकबाेटे यांच्यावरील दाखल गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारकडे चार्जशिट दाखल करण्याबाबत परवानगी मागण्यात आली आहे.
दरम्यान या वर्षी देखील माेठा जनसमुदाय काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. आक्षेपार्ह असणाऱ्या 25 टिकटाॅक व्हिडीओवर कारवाई करत पाेलिसांनी ते डिलीट केले आहेत. तर 15 फेसबुक पेज बंद करण्यात आले आहेत. 142 कलमानुसार अनेक व्हाॅट्सअप ग्रुपच्या प्रमुखांना देखील पाेलिसांडून नाेटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्याचबराेबर या काळात साेशल मीडियावर आक्षेपार्ह, प्रक्षाेभक लिखाण करणाऱ्यांवर पाेलिसांच्या सायबर सेलच्या मार्फत लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्यावर याेग्य ती कडक कारवाई करण्यात येणार आहे.