Pimpri Chinchwad: जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणी तीन महिलांवर गुन्हा; रहाटणी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 02:31 PM2023-07-13T14:31:26+5:302023-07-13T14:32:32+5:30
रहाटणी येथील ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
पिंपरी : जबरदस्तीने घरात घुसून महिलेला मोबाइलमधून धार्मिक स्थळाचे फोटो तसेच विशिष्ट धर्माचे पुस्तक वाचून दाखविले. त्यानंतर विशिष्ट धर्म माना, असे सांगून धर्मांतर करण्यास भाग पाडणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. नखाते वस्ती, रहाटणी येथे ही घटना घडली.
याप्रकरणी रहाटणी येथील ३९ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी फिर्यादी महिला या नातेवाईक महिलेसोबत घराबाहेर बोलत होत्या. त्यावेळी तीन महिला तेथे आल्या. त्यांनी फिर्यादी महिलेकडे विचारपूस केली. मी लातूर जिल्ह्यातील आहे, असे फिर्यादीने सांगितले. त्यांनीही त्या लातूरच्याच असल्याचे सांगून फिर्यादसोबत संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडील विशिष्ट धर्माची माहिती असलेले पुस्तक वाचून दाखविण्यास सुरुवात केली. त्यावर ‘मला यातील काही समजत नाही, तुम्ही परत येऊ नका’, असे फिर्यादीने त्यांना सांगितले.
त्यानंतर त्या तिघी निघून गेल्या. त्यानंतर १ जुलै रोजी दुपारी त्या महिला पुन्हा आल्या. त्यांच्याकडील मोबाइलमधील प्रार्थना स्थळाचे फोटो दाखवून, विशिष्ट धर्माची माहिती दिली. ‘तुम्ही हे काय सांगू नका, हे आम्हाला कळत नाही. आम्हाला इतर देव देवतांबद्दल सांगा’, असे फिर्यादी महिलेने सांगितले. त्या महिलांनी इतर देवतांबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. यापुढे तुम्ही आमच्याकडे येऊ नका, असे फिर्यादीने सांगितले.
दरम्यान, सोमवारी (दि. १०) त्या तीन महिला पुन्हा आल्या. फिर्यादीच्या संमतीशिवाय घरात घुसल्या. त्यांनी पुन्हा धार्मिक पुस्तक दाखवून तो धर्म माना अशी जबरदस्ती केली. फिर्यादीने त्यांना घरातून बाहेर जाण्यास सांगितले. परंतु त्या बाहेर जात नव्हत्या. त्यामुळे फिर्यादीने घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघी महिलांनी फिर्यादीलाही बाहेर जाण्यास मनाई केली. त्यांचा आवाज ऐकून फिर्यादीचा भाचा आला. आरोपी महिलांनी फिर्यादीच्या भाच्यालाही त्या धर्माबाबत सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे फिर्यादीने याबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.