दहावीच्या तोंडी परीक्षेचे गुण रदद् केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 07:25 PM2019-01-31T19:25:51+5:302019-01-31T19:34:29+5:30
राज्य मंडळाने तोंडी परीक्षांचे २० गुण रदद् करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर गुरूवारी ठिय्या आंदोलन केले.
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) यंदाच्या वषीर्पासून दहावीच्या परीक्षेत भाषा व सामाजिक शास्त्र विषयांच्या तोंडी परीक्षांसाठी दिले जाणारे २० गुणांची पध्दत रदद् केली आहे. या निर्णयामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी इतर मंडळांच्या तुलनेत अकरावी प्रवेशाच्यावेळी मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्य मंडळाने तोंडी परीक्षांचे २० गुण रदद् करण्याचा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राज्य मंडळाच्या कार्यालयासमोर गुरूवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे व विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांना निवेदन देण्यात आले. शासनाला याबाबत पत्र पाठविले जाईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर परीक्षा पध्दतीमध्ये काही बदल करण्यात आले. त्यामध्ये भाषा व समाजशास्त्र विषयांसाठी निर्धारित केलेली २० गुणांची तोंडी परीक्षा रदद करून या विषयांची परीक्षा आता १०० गुणांची घेतली जाणार आहे. वस्तूत: सीबीएसई व इतर मंडळांकडून परीक्षेसाठी ८० लेखी गुणांची परीक्षा व २० तोंडी गुणांची परीक्षा असा पॅटर्न राबविला जातो, त्यामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थ्यांचे गुण त्यांच्या तुलनेत मागे पडत असल्याने राज्य मंडळानेही हा पॅटर्न लागू केला होता. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आल्याने त्याचा दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा फटका बसणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या वेळेस राज्य मंडळाच्या तुलनेत इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांचे गुण अधिक असल्याने प्रवेश मिळविण्यात ते वरचढ ठरण्याची भीती पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभुमीवर युवा सेनेकडून याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळा कदम, शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, युवा सेना संपर्कप्रमुख रुपेश कदम, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रवीण पाटकर ,सुप्रिया करंडे, स्मिता झगडे ,मुंबई महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य साईनाथ दुर्गे ,विशाल धनवडे ,किरण साळी, केतन सावंत, सचिन बांगर, प्रवीण थोरात, पवन जाधव, निखिल जाधव ,निरंजन दाभेकर, कुणाल धनवडे आदी सहभागी झाले.