अनधिकृत बांधकामप्रकरणी वाघोलीतील ११ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:00 AM2020-12-02T04:00:06+5:302020-12-02T04:00:06+5:30
वाघोली :-वाघोली येथील जेएसपीएम कॉलेज शेजारी असणाऱ्या एका प्लॉटींगमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पीएमआरडीएने कारवाई करून ११ जणांवर लोणीकंद पोलीस ...
वाघोली :-वाघोली येथील जेएसपीएम कॉलेज शेजारी असणाऱ्या एका प्लॉटींगमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पीएमआरडीएने कारवाई करून ११ जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक नगररचनाकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३, ५४, ५५, ५६ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेएसपीएम कॉलेज शेजारी असणाऱ्या एका प्लॉटींगच्या अनधिकृत बांधकामाबाबत आलेल्या तक्रारीनुसार पीएमआरडीए अतिक्रमण विभागाचे अधिकारी बांधकाम पाडण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर रहिवास असणाऱ्या इमारती वगळता इतर बांधकामांवर कारवाई केली होती. कारवाई संपल्यानंतर मात्र पीएमआरडीएच्या सहाय्यक नगररचनाकार यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार ११ जणांवर जून २०१९ पासून अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवत कलम ५२ च्या पोटकलम (१) च्या खंड अ मध्ये निर्देश केल्याप्रमाणे सदरचे बांधकाम परवानगी व बांधकाम आराखड्यात मंजुरी न घेता करण्यात आल्याने गुन्हा दाखल केला आहे.
कारवाईने ग्रामस्थांमध्ये धास्ती व नाराजी
अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी वाघोलीतील ११ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे समजल्यानंतर ग्रामस्थ व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाघोलीत सद्यस्थितीत ७० टक्क्यांहून अधिक बांधकामे अनधिकृत आहेत. सरकारी गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात तसेच बिल्डरांचे देखील बांधकाम अतिक्रमणे असताना पीएमआरडीएने केलेल्या कारवाई बाबत ग्रामस्थांमध्ये धास्ती व नाराजी दिसून येत आहे.भविष्यात पीएमआरडीए विरुद्ध ग्रामस्थांचा असंतोष वाढू शकतो.