कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खाजगी कंपनीतील ५ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 14:57 IST2021-10-29T14:55:05+5:302021-10-29T14:57:10+5:30
पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या ...

कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खाजगी कंपनीतील ५ जणांवर गुन्हा दाखल
पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणाऱ्या एका १९ वर्षाच्या तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह ५ जणांविरुद्ध मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष व्यंकट कामनबोयना (वय १९, रा. बालाजीनगर, घोरपडी गाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी ऐश्वर्या जोशी, महिंद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुजाता व्यंकट कामनबोयना (३६) यांनी फिर्याद दिली आहे. आशिषने २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बालाजीनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा यश ज्योती डेबीट कन्सल्टसी कंपनीमध्ये काम करत होता. थकलेले हप्ते वसुल करण्याचे काम ही कंपनी करते. आशिष याने ग्राहकाकडून हप्ते वसुल करताना ते कंपनीच्या खात्यावर जमा करायला सांगण्याऐवजी आपल्या मित्राच्या खात्यावर ३० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले व ते पैसे खर्च केले. कंपनीचे पैसे परस्पर दुसऱ्या खात्यावर वळविल्याचे मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांना समजले. त्यानंतर आशिष यांची आई फिर्यादी यांनी कंपनीमध्ये जाऊन हे पैसे भरले.
तरीही ऐश्वर्या जोशी, महिद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांनी आशिष यास दररोज कंपनीमध्ये बोलावुन अजून रक्कम घेतल्याची भीती घालून त्याचा मानसिक छळ केला. त्यामुळे त्याने गुरुवारी दुपारी घरी आत्महत्या केली. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पोटे अधिक तपास करीत आहेत.