न्यायालयातच तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:36 PM2020-01-01T15:36:33+5:302020-01-01T16:07:49+5:30
मेरी दुसरी शादी तय हो चुकी है, मै दुसरी शादी करनेवाला हूॅ़, इसलिए मै तुझे तलाक देता हूँ...
पुणे : घरगुती वादातून पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या सुनावणीस न्यायालयात आल्या असताना पतीने त्यांना तोंडी तलाक देण्याचा प्रकार समोर आला आहे़. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी पतीविरुद्ध मुस्लिम वुमन अॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार लष्कर न्यायालयाच्या परिसरात १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडला होता़.
याप्रकरणी कोंढवा बुद्रुक येथील ३० वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेचा सनी याच्याबरोबर २०१५ साली विवाह झाला होता़. विवाहानंतर आरोपीचे आई वडिल, बहीण व नंणद यांनी घरगुती कारणावरुन तसेच एटीएम कार्ड परत घेतल्याच्या कारणावरुन तिला मारहाण केली़. तिला त्रास देऊ लागल्याने तिने कोंढवा पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली ४९८ कलमाखाली फिर्याद दिली होती. या केसची १७ डिसेंबर रोजी लष्कर न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी त्या आल्या होत्या. न्यायालयाच्या परिसरात त्या असताना तिचा पती व इतर त्यांच्याकडे आले़. तेव्हा त्यांच्या पतीने 'तुमने हमारे खिलाफ केस करके अच्छा नही किया़; हम कोर्टमे चक्कर मार रहे है़, लेकीन उसे हमे कुछ फरक नही़, तुझे किसके पास जाना है जा़, लेकिन मेरे घरवाले तुझे रखनेवाले नही़, तु कुछ भी कर, मेरी दुसरी शादी तय हो चुकी है, मै दुसरी शादी करनेवाला हूॅ़, इसलिए तु मेरे कुछ कामकी नही है, इसलिए मै तुझे तलाक देता हूँ, असे म्हणून त्यांना बेकायदेशीर तलाक दिला़. तसेच तेथून जाताना त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली आहे़. या महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़.
तोंडी तलाक विरोधी कायदा झाल्यानंतर अशा प्रकारे तलाक दिल्याने गुन्हा दाखल झालेला हा पुण्यातील दुसरा प्रकार आहे़.