Pune: अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या पतीला धमकावणाऱ्या पीएसआयवर गुन्हा दाखल; खात्यातून निलंबित
By विवेक भुसे | Published: April 8, 2023 03:20 PM2023-04-08T15:20:12+5:302023-04-08T15:21:16+5:30
कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली होती...
पुणे : आपल्या अनैतिक संबंधावरुन प्रेयसीच्या घरात शिरुन तिच्या पतीला शिवीगाळ करुन कमरेच्या पिस्तुलाला हात लावून जीवे ठार मारण्याची धमकी एका पोलीस उपनिरीक्षकाने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी प्रविण नागेश जर्दे या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रविण जर्दे हा सध्या कोर्ट आवार येथे नियुक्तीला आहे. कोथरुडमधील शास्त्रीनगर येथील एका सोसायटीत ही घटना १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली होती.
याप्रकरणी एका ४३ वर्षाच्या नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जर्दे याचे फिर्यादी याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. तिने हे संबंध सोडून द्यावेत, यासाठी फिर्यादी तिला सांगत होता. तिने हे प्रविण जर्दे याला सांगितले. त्यावरुन प्रविण जर्दे हा त्यांच्या घरात शिरला. त्याने फिर्यादी, त्यांची आई व मुलांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. यापुढे तिला काही बोलला तर माझ्याशी गाठ आहे. तसेच त्याने कमरेच्या पिस्तुलाला हात लावून तुम्हा सर्वांना ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. यामुळे फिर्यादी व त्यांच्या घरचे घाबरुन गेले होते. शेवटी त्यांनी हिंमत करुन पोलिसांकडे गेले. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दोन पोलीस उपनिरीक्षक निलंबित
गुन्हा दाखल झाल्याने त्याची दखल घेऊन अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस खात्यातून निलंबित केले आहे. तसेच गाडी मिळवून देण्याचा मोबदला म्हणून २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाच लुचपत पतिबंधक विभागाने ५ एप्रिल रोजी पवार याला अटक केली. न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी शशिकांत पवार याला निलंबित केले आहे.