Pune Crime: लोणावळ्यात खासगी बंगल्यावर पार्टीत गैरकृत्य करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 06:17 PM2021-11-14T18:17:52+5:302021-11-14T18:18:27+5:30
लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; ७४ लाखांचा माल जप्त
लोणावळा : कार्ला गावाच्या हद्दीतील एमटीडीसी शेजारील एका बंगल्यावर मोठ्या आवाजात गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली असून यात ९ पुरुष व ८ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याजवळील वाहने, फोन असा सुमारे ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ला गावातील एमटीडीसीजवळ, दुर्गा सोसायटीमधील तन्वी बंगल्यामध्ये मोठ्या आवाजात गाणे लावून त्यावर अश्लील हावभाव करून नाचत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर, लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. तेथून एकूण १७ जणांना ताब्यात घेऊन अटक केली.
खासगी बंगल्यामध्ये विनापरवाना गैरकृत्य करताना ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्निल जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब वीर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व रा. चऱ्होली व भोसरी परिसर) यांच्यासह ८ महिलांना अटक केली आहे. तेथून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी ५ वाहने, स्पीकर असा एकूण ७४ लाख २७ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस उप अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहायक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस नाईक प्रणयकुमार उकिर्डे आदींच्या पथकाने केली.